शहरातील आयलँडचा घेर कमी करा
By Admin | Updated: May 8, 2014 12:25 IST2014-05-08T12:25:42+5:302014-05-08T12:25:42+5:30
सुशोभीकरण करतानाच वाहतुकीचा विचार करण्याची मागणी

शहरातील आयलँडचा घेर कमी करा
कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वी शहरातील वाहतुकीचा विचार करून शहरातील मुख्य चौकांत पुतळे व आयलँडची उभारणी केली. आता वाढत्या नागरिकरणामुळे शहरात वाहतुकीचा ताण वाढला आहे. पुतळ्याभोवतीचे कठडे व आयलँडभोवतीची संरक्षक भिंत कमी करून वाहतुकीचा ताण कमी करावा, अशी मागणी अनेक वाहनधारकांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनवर केली. शहरातील अयोध्या चित्रमंदिराच्या दारात असलेल्या आईसाहेब महाराज पुतळ्याभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्याभोवती असणारे संरक्षण कुंपण खराब होऊन पुतळ्यासमोरील मोठा कारंजाही गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत होता. नवीन आराखड्यानुसार पुतळ्याच्या मागून असलेला प्रवेशात बदल करून पूर्वेकडून प्रवेशद्वार केले जाणार आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस बगीचा केला जाईल. पुतळ्याच्या समोरील जुना कारंजा काढून तिथे रेखीव दगडी चबुतरा उभारला जाणार आहे. संगमरवरी पुतळा प्रदूषणामुळे काळवंडला आहे. तज्ज्ञांकडून पुतळ्याची स्वच्छता करून पूर्ववैभव प्राप्त केले जाणार आहे. शिवाजी टेक्निकल व ट्रेझरीच्या बाजूला दीर्घकाळ टिकणारे छोटे कारंजे उभारण्यात येणार आहे. लक्ष्मीपुरीकडे जाणार्या वाहतुकीचा ताण विचारात घेऊनच संरक्षक भिंतीची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे. शिवाजी पूल येथील आयलँडही मोठा आहे. वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. नवीन शिवाजी पुलाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर चौकातील आयलँडची निर्मिती करताना शहरात कोकणातून येणार्या वाहनांचा विचार केला जावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)