मंदीमुळे रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवा

By Admin | Updated: December 15, 2014 23:59 IST2014-12-15T23:38:31+5:302014-12-15T23:59:12+5:30

शासनाकडे प्रस्ताव : दर वाढल्यास बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची शक्यता

Redirection rates were 'like' due to recession | मंदीमुळे रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवा

मंदीमुळे रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवा

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांसह नव्याने स्थावर मालमत्ता खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना नवीन वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्या (रेडिरेकनर)च्या वाढीचे वेध लागले आहेत.
दरवर्षीप्रमाणे ३१ डिसेंबरला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी संपूर्ण राज्याचा नवा रेडिरेकनर तक्ता जाहीर करतील. याचा १ जानेवारीपासून तत्काळ अंमल होईल. यावर्षी रेडिरेकनर वाढीमुळे शहरातील जागेच्या दरात सरासरी दहा हजार रुपये प्रती चौरस मीटरपर्यंतची वाढ होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मंदीमुळे यावर्षी रेडिरेकनरचा दर ‘जैसे थे’ ठेवावा, अशी विनंती राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी पी. डी. शेळके यांनी ‘लोकमत’ला दिली.
मागील वर्षी वाढलेल्या रेडिरेकनरमुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिर, गुजरी परिसर, भाऊसिंगजी रोड परिसर, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, राजारामपुरी परिसरातील जागेच्या दरात मोठी वाढ झाली.
२० ते २६ हजारांपर्यंत असलेल्या दरासाठी २७ ते ४० हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागली. झोपडपट्टीसह उपनगरांतील परिसरात यापूर्वी खुल्या जागेसाठी ७०० रुपये असणारा दर १२०० रुपये झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी हाच दर १० हजारांवरून १२ हजारांपर्यंत झाला.
रेडिरेकनरच्या वाढीमुळे मरगळलेला बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत आला. यावर्षी पुन्हा रेडिरेकनरची दरवाढ झाल्यास घरासह जागेच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी स्वप्नातीलच घर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)


नव्या दराचा १ जानेवारीपासून अंमल होणार आहे. ३१ डिसेंबरअखेर खरेदी केलेल्या मुद्रांकावर व्यवहाराचा तपशील लिहून सही केलेला मुद्रांक जुन्या रेडिरेकनर दरानेच ३० एप्रिल २०१५ पर्यंत चालणार आहे. तसेच मंदीमुळे नव्याने दरवाढ करू नये, अशी विनंती शासनाला केली आहे.
- पी. डी. शेळके (जिल्हा मुद्रांक अधिकारी)



यापूर्वी शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. मंदीमुळे अगोदरच सर्वच स्थावर व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. नव्याने दरवाढ झाल्यास व्यवहारावर आणखी परिणाम होऊन व्यवहार कमी होण्याची शक्यता आहे.
- अ‍ॅड. जीवन पाटील



रेडिरेकनरच्या वाढीमुळे जागेसह घरांच्या किमती, घरफाळा, सेल्स टॅक्स, स्टॅम्प ड्यूटी, मुद्रांक नोंदणीतही वाढ होणार आहे. मंदीमुळे बांधकाम व्यवसाय थंडावला आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्यास आणखी अडचणी वाढणार आहेत. यापूर्वीच वाढलेल्या घरांच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घराच्या किमती जातील. त्यामुळे रेडिरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.
- गिरीष रायबागे (अध्यक्ष - क्रिडाई कोल्हापूर)

Web Title: Redirection rates were 'like' due to recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.