लालचुटूक गाजर, हिरवागार हरभरा

By Admin | Updated: December 1, 2014 00:08 IST2014-11-30T23:44:24+5:302014-12-01T00:08:17+5:30

आठवडी बाजार : कांदा, तेल, साखर घसरले; हरियाणा, पंजाबच्या माल्टाचे आकर्षण, मार्गशीर्षमुळे फळांची रेलचेल

Red chutney carrot, green gram | लालचुटूक गाजर, हिरवागार हरभरा

लालचुटूक गाजर, हिरवागार हरभरा

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरकी तेल, साखरेसह कडधान्य मार्केटमध्ये कमालीची मंदी जाणवत असून दरही घसरले आहेत. किरकोळ बाजारात लहान (एस) साखर २८ रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्यांच्या दरात चढ-उतार कायम असून हरभरा व गाजरांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. संत्री, माल्टा व बोरांनी फळ मार्केट अक्षरश: फुलून गेला आहे. मार्गशिर्ष महिन्यामुळे पूजेसाठी विविध फळांची आवक वाढली आहे.
दोन आठवडे भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो कमालीचा घसरला होता. घाऊक बाजारात अडीच रुपये किलोपर्यंत टोमॅटो खाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या आठवड्यात दरात थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाली असून ६ रुपयांपर्यंत दर राहिला आहे. ढब्बू, गवार, कोथिंबीरच्या दरात वाढ झाली असून, वांगी, ओला वाटाणा, भेंडी, वरणा, दोडक्याचा तुलनात्मकदृष्ट्या दर कमी झाला आहे. हरभऱ्याची आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात हरभरा पेंडी सहा रुपये, तर मेथी आठ रुपये पेंडी आहे.
गुळाची आवक वाढली असून, दर स्थिर आहेत. सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३१०० ते ३४५० पर्यंत दर मिळत आहे. बटाट्याची आवक स्थिर राहून दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा निम्याने दर खाली आला आहे.
मार्गशीर्ष महिना असल्याने प्रत्येक गुरुवारी घरोघरी पूजा होत असल्याने बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व प्रकारच्या फळांची रेलचेल संत्री, बोरे व माल्टा आवक वाढली आहे. हरियाणा, पंजाब येथून माल्टाची तर सांगोला, पंढरपूर येथून ‘चमेली’, ‘उमराण’ व ‘कडाका’ या बोरांची आवक सुरू आहे. डाळिंबचा हंगाम अंतिम टप्प्यात असून आवक घटल्याने दरात सरासरी ४० टक्के वाढ झाली आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात द्राक्षे दिसतात, पण यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने अद्याप आवक झालेली नाही. (प्रतिनिधी)


कांदा पुन्हा घसरला
गेल्या आठवड्यात कोल्हापुरात कांद्याची आवक सरासरी ६८९३ पोत्यांची होती. पण या आठवड्यात त्यात वाढ होऊन ती ९९५४ पोत्यापर्यंत झाल्याने त्याचा कांद्याच्या दरावर परिणाम झाला. सरासरी चौदा रुपयांचा कांदा बारा रुपयांपर्यंत खाली आला आहे.



अंडी वधारली
थंडी सुरू झाल्याने अंड्यांची मागणी वाढली असून, किरकोळ बाजारात एका अंड्याचा दर पाच रुपयांपर्यंत गेला आहे. गोव्यातून अंड्यांची मागणी अधिक असल्याने मार्केट
एकदमच उचलल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून आगामी महिन्याभरात सहा रुपयांपर्यंत दर जाऊ शकतो.

Web Title: Red chutney carrot, green gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.