घरपट्टीची वसुली १0 कोटींवर
By Admin | Updated: November 25, 2014 23:48 IST2014-11-25T23:07:53+5:302014-11-25T23:48:18+5:30
पालिकेला दिलासा : दोन दिवसांत ८0 लाखांची वसुली

घरपट्टीची वसुली १0 कोटींवर
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने वसुलीचा वेग वाढविल्यामुळे यंदाच्या एकूण वसुलीचा आकडा दहा कोटींवर गेला आहे. गेल्या दोन दिवसात या विभागाने तब्बल ८0 लाखांची घरपट्टी वसूल केली. तांत्रिक कारणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेली बिलेही तातडीने या विभागाने पाठविल्यामुळे वसुलीत महापालिकेला दिलासा मिळत आहे.
महापालिकेच्या घरपट्टी विभागाची चालू आर्थिक वर्षाची एकूण मागणी २६ कोटीची आहे. त्यापैकी २५ नोव्हेंबरअखेर १0 कोटी २0 लाख इतकी वसुली झाली आहे. गतवर्षाच्या थकबाकीचा विचार करता, एकूण वसुली ५0 कोटीच्या घरात आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी घरपट्टी विभागाची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे.
२४ सप्टेंबर रोजी एका दिवसात या विभागाने ४८ लाखांची वसुली केली. आज, मंगळवारी ३३ लाख २३ हजार ६0३ रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे वसुलीचा एकूण आकडा आता वेगाने वाढत आहे. सर्व विभागात घरपट्टीची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यामुळे घरपट्टी विभागाला आयुक्त अजिज कारचे यांनी वसुलीबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत.
चालू आर्थिक वर्षात केवळ चार महिने उरले असल्याने कमी कालावधित मोठी वसुली करावी लागणार आहे. गेल्या दोन दिवसांचा वेग कायम राहिला, तर यंदा घरपट्टीची विक्रमी वसुली होऊ शकते. चालू आर्थिक वर्षाची वसुली करतानाच महापालिकेला थकबाकी वसुलीसाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. (प्रतिनिधी)
मालमत्तांची वसुली ६0 लाखांवर
मालमत्ता विभागाचे उद्दिष्ट ९ कोटींचे आहे. त्यापैकी आजअखेर ६0 लाख वसूल झाले आहेत. मालमत्तांची ४ ते ५ कोटींची फुगीर आकडेवारी आहे. यामध्ये राष्ट्रपती दौऱ्यावेळी २00८ मध्ये काढण्यात आलेल्या खोक्यांची बिले अजूनही निघत आहेत. त्याचे आकडे उद्दिष्टाला फुगवत आहेत. त्याचबरोबर चुकीच्या मूल्यांकनामुळे काही संस्थांकडे मोठी मागणी गेली आहे. या गोष्टी प्रशासकीय पातळीवर सोडविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.