वसुलीसाठी दारात सनई-चौघडा
By Admin | Updated: January 11, 2016 01:08 IST2016-01-11T00:55:37+5:302016-01-11T01:08:15+5:30
जिल्हा बॅँक : वसुलीसाठी संचालक थकबाकीदारांच्या आज दारात जाणार

वसुलीसाठी दारात सनई-चौघडा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी थकबाकीदार मानसिंगराव गायकवाड, डॉ. संजय एस. पाटील, विजयमाला देसाई यांच्यासह चौघांच्या दारात वसुलीसाठी आज, सोमवारी जाणार आहेत. संचालक मंडळाने गांधीगिरी पद्धतीने वसुलीचा निर्णय घेतला असून, वसुलीसाठी थेट थकबाकीदारांच्या दारात जाणारे जिल्हा बँकेचे पहिलेच संचालक आहे.
बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बँक अडचणीत आल्याने प्रशासक आले. प्रशासकानंतर पुन्हा संचालक मंडळ कार्यरत झाले असले तरी त्यांच्यासमोर वसुलीचे मोठे आव्हान आहे. ‘दौलत’, ‘उदयसिंगराव गायकवाड कारखाना’, ‘तंबाखू उद्योग समूह’, ‘इंदिरा कारखाना’ आदी बड्या थकबाकीदारांकडून वसुलीला प्रतिसादच मिळत नाही. त्यातील ‘दौलत’चा तिढा सोडविण्यास यश आले आहे. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांकडे संचालक मंडळाने मोर्चा वळविला आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अप्पी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह संचालक, अधिकारी व कर्मचारी सोमवारी दुपारी एक वाजता चार प्रमुख कर्जदारांच्या दारात जाणार आहे.
पहिल्यांदा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्या निवासस्थानी सनई-चौघड्यासह संचालक जाणार आहेत. त्यानंतर इंदिरा गांधी महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी, तंबाखू समूहाचे डॉ. संजय एस. पाटील व कोल्हापूर जिल्हा बीजोत्पादक संघाचे
वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी धडक देणार आहेत.