‘बाजार’ बहाद्दरांची होणार वसुली
By Admin | Updated: November 20, 2014 00:06 IST2014-11-19T23:39:39+5:302014-11-20T00:06:13+5:30
लवकरच लवाद नेमणार : ६४ माजी संचालकांवर जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू

‘बाजार’ बहाद्दरांची होणार वसुली
राजाराम लोंढे - कोल्हापूर -कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ६४ माजी संचालकांच्या कारभारामुळे समितीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी संचालकांना नोटिसा व त्यांवरील त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आर्थिक नुकसान निश्चित करण्यासाठी लवादाची नेमणूक येत्या आठ-दहा दिवसांत केली जाणार असून, तेच संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करणार आहेत.
बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार वर्षभरापूर्वी विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार सहा वर्षांतील कामकाजाच्या चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; तोपर्यंत तत्कालीन संचालकांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी रंजन लाखे यांच्यामार्फत १९८७च्या कारभाराची चौकशी केली. यामध्ये अनेक निर्णय बेकायदेशीर घेऊन समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी अधिकारी रंजन लाखे यांनी ठेवला होता. यासह भूखंड वाटप, नोकरभरती या कारणांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीची कारवाई केली होती. समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बरखास्त संचालकांना नोटिसा लागू केल्या होत्या. त्यानुसार संचालकांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता लवाद नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. किती नुकसान झाले हे चौकशी अहवालात नमूद केलेले आहे. फक्त त्या नुकसानीला कितीजण जबाबदार आहेत, हे निश्चित केले जाणार आहे.
संचालक मंडळात या दिग्गजांचा समावेश
बळवंत कृष्णाजी पाटील (सोनाळी), बाबूराव हजारे (वाशी), मारुती धोंडिबा खाडे (सांगरूळ), पी. आर. देसाई (देसाईवाडी), बाबासो ज्ञानू पाटील (भुये), शंकरराव चौगले (माजगाव, राधानगरी), दत्तात्रय रामचंद्र पाटील (वरणगे-पाडळी), बंडोपंत पाटील (म्हाकवे), सतीश पाटील (आकुर्डे), विठ्ठल भास्कर (कुडित्रे), शशिकांत नष्टे (कोल्हापूर), संभाजी आकाराम पाटील (कुडित्रे), धोंडिराम वारके (दिंडेवाडी, भुदरगड), शामराव पाटील (वाळोली, पन्हाळा), बाबगोंडा पाटील (कागल), चिल्लाप्पा पाटील (म्हालसवडे), कृष्णराव पाटील (राशिवडे), पी. डी. पाटील (पाडळी बुदु्रक), रंगराव मोळे (घरपण), उदयसिंह पाटील (कावणे), अतुल शहा (कोल्हापूर), रघुनाथ गणपती पाटील (प्रयाग चिखली) यांच्यासह ६४ माजी व बरखास्त संचालकांचा समावेश आहे.