शाहू कारखान्यासाठी विक्रमी ८६.३९ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:53 IST2016-09-21T00:52:33+5:302016-09-21T00:53:18+5:30
मतदान शांततेत : आज दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार; ऊस उत्पादक गटातून ११ संचालकांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात

शाहू कारखान्यासाठी विक्रमी ८६.३९ टक्के मतदान
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ८६.३९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. १३,५०० मतदारांपैकी ११,६६२ मतदारांनी शांततेत मतदानाचा अधिकार बजावला.
ऊस उत्पादक गटातून ११ संचालकांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंंगणात राहिल्याने हे मतदान झाले. कारखान्याचे बहुसंख्य सभासद मतदानाला आले होते. आज, बुधवारी कारखाना कार्यस्थळावर मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.
येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शैक्षणिक संकुलात सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. १६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांतून सभासदांना आणणे-सोडण्यासाठी वाहनांची जय्यत व्यवस्था केली होती. यामुळे सकाळी दहा वाजता कागल-मुरगूड रोड, शैक्षणिक संकुलाचा परिसर वाहनांच्या गर्दीने भरून गेला होता. ११.३० वाजता तर कागल-मुरगूड रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली. तेथे उतरून सभासद चालत मतदान केंद्रावर आले.
मतदान केंद्रावर सभासदांच्या रांगा लागल्या. दुपारी एकपर्यंत ही गर्दी कायम होती. हळूहळू गर्दी कमी होत गेली. दुपारी तीन वाजता बाहेरून आलेली वाहने निघून गेल्याने परिसर मोकळा झाला.
सायंकाळी पाचपर्यंत तुरळक मतदान सुरू होते. सकाळी १० वा. ३० टक्के, १२ वा. ५० टक्के, तर अडीच वा. ७० टक्के मतदान झाले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह जाधव, तहसीलदार किशोर घाडगे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह कार्यकारी संचालक विजयसिंह औताडे, सेक्रेटरी एस. ए. कांबळे, अजित कुलकर्णी आदींसह अधिकारी, कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मतमोजणी आज
चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. १२ पैकी ११ जागांसाठी मतदान झाले आहे. आज, बुधवारी सकाळी आठ वाजता कारखाना कार्यस्थळावर गोडावूनमध्ये मतमोजणीस प्रारंभ होईल. १६ टेबलांवर एकाचवेळी ही प्रक्रिया सुरू होणार असल्याने दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होईल. अपक्ष सदाशिव तेलवेकरांना किती मते मिळणार? याची उत्सुकता आहे.