रंकाळ्यातील गाळ तपासणी सुरू
By Admin | Updated: April 11, 2015 00:10 IST2015-04-10T23:59:01+5:302015-04-11T00:10:18+5:30
पंधरा दिवसांत परीक्षण : पाणी शुध्दीकरणासाठी होणार उपाययोजना

रंकाळ्यातील गाळ तपासणी सुरू
कोल्हापूर : रंकाळ्यातील हिरवे झालेले पाणी नैसर्गिकरित्याच शुद्ध व्हावे यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची चाचपणी करण्यासाठी रंकाळ्याच्या गाळाची तपासणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नेरूळ येथील संस्थेला हे काम सोपविण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत गाळाच्या तपासणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात थांबले असले तरी गाळातील सांडपाण्याच्या अंशामुळे पुन्हा पाण्याचा रंग बदलू शकतो. रंकाळ्याची या समस्येतून कायमची मुक्तता करण्यासाठी रंकाळ्यातील गाळाचा ‘बॅरोमेट्रीक सर्व्हे’ केला जाणार आहे. पाण्याची खोली व गाळाचे गुणधर्म याची माहिती या सर्व्हेतून समजण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून सव्वा चार कोटी रुपये खर्चून शाम सोसायटी ते दुधाळी नाल्यापर्यंत ९०० व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली.
रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या परताळा या ठिकाणी सानेगुरुजी वसाहतीतून आलेले चार लाख लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत होते, तर शाम सोसायटी नाल्यातून आलेले तब्बल १० एमएलडी पाणी दुसऱ्या बाजूने रंकाळ्यात मिसळते. दोन्ही ठिकाणचे पाणी एकत्र करून ड्रेनेज लाईनद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी दुधाळी येथे २६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडले आहे. मात्र, यापूर्वी सोडलेल्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा मूळ गुणधर्मच बदलला आहे.
रंकाळ्याच्या गाळात अडकलेल्या ब्लू अग्लीसारख्या वनस्पती व गाळातील सांडपाण्याच्या अंशांमुळे रंकाळ्याचे पाणी वारंवार रंग बदलून दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात गाळाची शास्त्रीय चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार रंकाळ्याच्या दूषित पाणी कायमचे शुद्ध राहण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे समजणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)