धातुतंत्र प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमांना मान्यता
By Admin | Updated: July 16, 2015 00:51 IST2015-07-16T00:51:24+5:302015-07-16T00:51:24+5:30
प्रवेश क्षमतेत वाढ : राष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रमात समानता राहणार

धातुतंत्र प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमांना मान्यता
कोल्हापूर : फौंड्री उद्योगाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये धातुतंत्र प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. या प्रबोधिनीतील पदविका अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली. शिवाय प्रवेश क्षमतेत वाढ करून ४०० जागांना मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र बुधवारी मिळाल्याची माहिती प्रबोधिनीचे समन्वयक शशांक मांडरे यांनी दिली.समन्वयक मांडरे म्हणाले, तंत्रनिकेतनमध्ये कम्युनिटी कॉलेजअंतर्गत कोल्हापूरमधील स्थानिक फौंड्री उद्योग लक्षात घेऊन फौंड्री टेक्नॉलॉजी व कास्टिंग डेव्हलपमेंट अॅँड क्वालिटी कंट्रोल पदविका अभ्यासक्रम सुरू केले. कम्युनिटी कॉलेजचे पुढचे पाऊल म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाने धातुतंत्र प्रबोधिनीतील कम्युनिटी स्किल डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा व अन्य अभ्यासक्रमांना मान्यता दिली. त्यामुळे हे अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवर एकसारखे राबविले जाणार आहेत. परिणामी फौंड्री उद्योगासाठी तयार होणाऱ्या मनुष्यबळाच्या निकषांत समानता राहणार आहे. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फे्रमवर्कमध्ये धातुतंत्र प्रबोधिनीचा समावेश झाला आहे. यासाठी कोल्हापूरने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
स्किल इंडियाला कोल्हापूरने प्रबोधिनीच्या माध्यमातून पहिली भेट दिली आहे. कम्युनिटी कॉलेजसाठी आवश्यक असणारे स्किल नॉलेज प्रोव्हायडर म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाने घाटगे-पाटील इंडस्ट्रीजला मान्यता दिली आहे. तसेच साउंड कास्टिंग्ज, मंत्री मेटॅलिक्स व मेनन अॅँड मेनन यांनीदेखील या पद्धतीने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांनीदेखील प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमांना आवश्यक असणाऱ्या शास्त्र विषयांसाठीच्या प्रयोगशाळा व तज्ज्ञ, प्राध्यापक उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. त्या दृष्टीने प्रबोधिनी लवकरच या महाविद्यालयाशी सामंजस्य करार करणार आहे. (प्रतिनिधी)
‘कौशल्यदान’ योजना राबविणार
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुला-मुलींसाठी धातुतंत्र प्रबोधिनीमध्ये ‘कौशल्यदान’ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य के. पी. कुंभार यांनी दिली. ते म्हणाले, प्रबोधिनीतील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अशा मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्याची तयारी घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने दाखविली आहे.