खरोखरचा नाग कार्यालयात सोडू
By Admin | Updated: July 24, 2016 00:38 IST2016-07-24T00:14:10+5:302016-07-24T00:38:20+5:30
अंबाबाई नागचिन्ह प्रश्न : राष्ट्रवादीचा इशारा

खरोखरचा नाग कार्यालयात सोडू
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान नागचिन्ह घडवायचे राहून गेले आहे. देवस्थान समितीने पुढाकार घेऊन लवकरात लवकर मूर्तीवर नागचिन्ह घडविले नाही तर खरोखरचा नाग समितीच्या कार्यालयात आणून सोडू, असा इशारा कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
पक्षाच्या वतीने देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांना शनिवारी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करवीर निवासिनी अंबाबाई हे तमाम महाराष्ट्रीय, कन्नड, आंध्रसह देशभरातील भाविकांचे दैवत आहे. मूर्तीवर करण्यात आलेल्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान मूर्तीच्या मस्तकावरील नागचिन्ह जाणीवपूर्वक गायब करण्यात आले आहे. देवीस लक्ष्मी बनविण्याचा अट्टहास का? या प्रकारामुळे भाविकांत प्रचंड संताप आहे. मंदिराचे व देवतेचे व्यावसायीकरण होत असून त्यासाठीच जाणीवपूर्णक मूर्ती अपूर्णावस्थेत ठेवण्यात आली आहे.खरे तर हा धार्मिक अनाचार आहे. लवकरात लवकर देवीच्या मस्तकावर नागचिन्ह घडविले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस खरोखरचा नाग देवस्थानाच्या कार्यालयात सोडील. यावेळी अध्यक्ष अमोल माने, युवराज साळोखे, नागेश फराडे, किशोर माने, बबलू फाले, आदी उपस्थित होते.