रियालिटी चेक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:50+5:302021-01-08T05:14:50+5:30
सचिन भोसले लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंंबणा होते. ही बाब लक्षात ...

रियालिटी चेक :
सचिन भोसले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंंबणा होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बाळाला स्तनपान करता यावे, याकरिता सहा वर्षांपूर्वी राज्यातील प्रत्येक बसस्थानकामध्ये हिरकणी कक्षाची निर्मिती केली. त्यामुळे मातांसह बाळांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत मिळत आहे. कोल्हापुरातील प्रत्येक स्थानकामध्ये महिलांनी मागणी केल्यानंतर या कक्षाचे कुलूप आगारप्रमुखाकडून काढून दिले जाते.
एस.टी. महामंडळाने प्रवास करताना प्रवाशांच्या सोयी करण्यासाठी अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक स्थानकात हिरकणी कक्ष नावाची योजना राज्यात सुरू केली. प्रत्येक बसस्थानकावर महिलांना बाळांना स्तनपान करता यावे, यासाठी या कक्षामध्ये अशा मातांना बसण्याकरिता आसन व्यवस्थांची सोय केली आहे. याचा लाभ कोल्हापुरातील प्रत्येक स्थानकात महिला घेत होत्या. त्याबद्दल स्थानक प्रमुखांकडून हा कक्ष सुरू झाल्यानंतर त्याची उद्घोषणाही ध्वनिपेक्षकावरून केली जात होती. पण नव्याचे नऊ दिवस... या म्हणीप्रमाणे ही उद्घोषणाही काही काळानंतर बंद करण्यात आली. बसस्थानकावर जागृती करणारे फलकही लावणे अपेक्षित आहे. हा कक्ष एका बाजूला आहे. त्यामुळे सहजसहजी महिलांना दिसत नाही. अशा प्रकारचा कक्ष प्रत्येक बसस्थानकात आहे, याची कल्पनाच महिलांना नाही. काही महिलांनी हा कसला कक्ष आहे, अशी विचारणा केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी कक्षाची माहिती द्यावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत कोरोनाचे कारण देऊन हा कक्ष बंद आहे.
किती महिलांना ठावूक ?
प्रवासादरम्यान आलेल्या पन्नास टक्के महिलांना अशा प्रकारचा कक्ष असतो, याची माहिती नाही. ज्यांना माहिती आहे, त्यांच्याकडून या कक्षाचा वापर केला जातो. काही महिलांना हा कक्ष बंदिस्त हवा आहे, काचेचा नको आहे.
कोट
हा कक्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिने बंद ठेवला होता. हा कायमस्वरूपी उघडा न ठेवता कुलूप लावले जाते. चौकशी कक्षात संबंधित महिलांनी मागणी केल्यानंतर तो उघडून दिला जातो.
- अजय पाटील, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर
फोटो : ०४०१२०२१-कोल-एसटी स्टॅंड
ओळी :
कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील बंद स्थितीत असलेला हिरकणी कक्ष.
(छाया : नसीर अत्तार)