पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज : सैनी
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:51:06+5:302015-06-04T00:01:10+5:30
आपत्ती नियोजनासाठी बैठक : नृसिंहवाडीत घेतला तयारीचा आढावा

पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज : सैनी
नृसिंहवाडी : संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिला. नृसिंहवाडी येथील दत्त देव संस्थानच्या भक्तनिवास हॉलमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमाजवळ एकत्रित होऊन नंतर कर्नाटकात जाते. नृसिंहवाडी येथे पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिली. या बैठकीत त्यांनी संपर्क यंत्रणा हायटेक करण्याचे आदेश दिले.
आढावा बैठकीत ते म्हणाले, सुरक्षा यंत्रणा एसएमएस, वॉकी टॉकी, मोबाईल, हॅम रेडिओ सिस्टिम, आदी अनेक आधुनिक साधनांचा वापर करून तत्पर करावी, यासाठी आवश्यक लागणारा पैसा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावा. गावातील तरुणांना ट्रेनिंग द्यावे. आपत्ती, घटनास्थळी ते नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संपर्क यंत्रणा गतिशील ठेवणे अत्यावशक आहे. नदीकाठच्या धोकादायक इमारतींची यादी करून त्या लवकरात लवकर रिकाम्या कराव्यात.
यावेळी विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा अहवाल दिला. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, नृसिंहवाडीचे उपसरपंच अभिजित जगदाळे, मुख्याधिकारी कुरुंदवाड नगरपालिकेचे अतुल पाटील, शिरोळचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, आदींनी नियोजनाचे अहवाल सादर केले. दत्त देव संस्थानच्यावतीने अमित सैनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोमनाथ पुजारी, संजय पुजारी, ग्रा. पं. सदस्य अशोक पुजारी, अनंत धनवडे, गटविकास अधिकारी देसाई, नायब तहसीलदार वैभव पिलारे, सर्कल अधिकारी एन. डी. पुजारी, आदी उपस्थित होते.
‘आपत्तीकाळात पशुधन वाचवा’
सदाशिव आंबी यांनी आपत्ती काळात मनुष्य जिवाला वाचविण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा राबविली जाते. मात्र, पशुधन वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी सूचना मांडली. यावर निश्चित विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
मोबाईल बंद ठेवू नका
अधिकाऱ्यांनी मोबाईल संच बंद ठेवू नयेत. नैसर्गिक आपत्तीसारख्या आणीबाणीवेळी स्वत:ला त्रास होईल म्हणून आपला मोबाईल संच बंद न ठेवता जनतेच्या सेवेसाठी त्याचा वापर करावा, अशा सक्त सूचना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
शिरोळमध्येही आढावा
शिरोळ : जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी बुधवारी शिरोळ तहसील कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करून लोकांची कामे वेळेवर करा, पुढील बैठक ीवेळी प्रत्येकाने सविस्तर माहिती देण्याची तयारी ठेवावी, असे सांगून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.