नव्या गाड्यांसाठी फेरनिविदा
By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T01:03:59+5:302014-07-08T01:05:45+5:30
तांत्रिक बदल केले : बसेसची खरेदी लांबणीवर पडणार

नव्या गाड्यांसाठी फेरनिविदा
कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे (के.एम.टी.) घेण्यात येणाऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यासाठी कमी दर व तांत्रिक बदल करून पुन्हा फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नव्या निविदेमुळे के.एम.टी.ला दर बसमागे किमान ८० हजार रुपयांचा फायदा होईल. नवतंत्रज्ञानयुक्त बसेसमुळे व्यवस्थापन खर्चातही बचत होणार आहे. मंगळवारपासून सात दिवसांची निविदेसाठी मुदत देण्यात आली आहे.
के.एम.टी. प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. के.एम.टी.ने यापूर्वी काढलेल्या निविदेला टाटा मोटर्स (२५.८० लाख), अशोक लेलँड (२५.३३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स् (२७.०३ लाख) या दराप्रमाणे प्रतिसाद दिला. या तीन कंपन्यांच्या निविदा शुक्रवारी (दि. ४) उघडण्यात आल्या होत्या. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्तस्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करण्यात येण्याची शक्यता होती.
मात्र, ही निविदा ३४ प्रवासी क्षमता असलेल्या बसेससाठी होती. त्यामध्ये बदल करत के.एम.टी.ने आता ३२ प्रवासी क्षमता असलेली निविदा प्रसिद्ध केली आहे. कमी प्रवासी क्षमतेच्या बसेसमुळे इंधनात मोठी बचत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त या बसेस शहरातील रस्त्यांवर फिरण्यास अत्यंत सोईच्या आहेत. त्यामुळे लहान गल्लीतूनही ही बस सहज जाऊ शकते. केंद्राने जारी केलेल्या आदेश व सूचनांचे पालन करूनच खरेदीची प्रक्रिया राबविण्यावर महापालिकेचा भर आहे. दरम्यान, नव्या बसेसची खरेदी लांबणीवर पडणार असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढणार आहेत.