आर.डी., सचिन चव्हाणांना झटका
By Admin | Updated: October 16, 2015 00:04 IST2015-10-15T01:08:24+5:302015-10-16T00:04:08+5:30
महापालिका निवडणूक : १९ उमेदवारांचे अर्ज अवैध; निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले

आर.डी., सचिन चव्हाणांना झटका
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या छाननीत १९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये काँग्रेस उमेदवार सचिन प्रल्हाद चव्हाण (नाथा गोळे तालीम), भाजपचे नगरसेवक राम दादोबा ऊर्फ आर. डी. पाटील यांचा समावेश आहे. चव्हाण यांचा अर्ज अवैध होईल हे अपेक्षित होते, परंतु पाटील यांना मात्र अनपेक्षितपणे निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली.बुधवारी सकाळी एकाचवेळी सातही क्षेत्रीय कार्यालयांतून उमेदवारांच्या समक्ष उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली. ज्यांच्या उमेदवारीवर आक्षेप होते, त्यांनी निवडणूक कार्यालयात वकिलांची फौजच आणली होती. विशेषत: सचिन चव्हाण, आर. डी. पाटील, दिलीप पोवार यांच्या अर्जांच्या छाननीवेळी तणाव दिसून आला; परंतु केवळ वादावादीव्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार न घडता छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. ताराराणी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुक्त सैनिक वसाहत प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या अमरनाथ काटकर यांनी उमेदवारी अर्जासोबत जातीचा दाखला अथवा त्यासाठीची मागणी केल्याचा अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. (प्रतिनिधी)
हायकोर्टात जाणार : चव्हाण
गांधी मैदान क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी काँग्रेसचे नगरसेवक सचिन चव्हाण यांचा नाथा गोळे प्रभागातून अर्ज अवैध ठरविला. चव्हाण गटाला हा मोठा धक्का आहे.
गतनिवडणुकीत कुणबी जातीचा चव्हाण यांचा दाखला अवैध ठरवून तो जप्त करण्याचे आदेश झाले होते. त्यामुळे त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास कायद्यानेच बंदी आली होती. बुधवारी बराच वेळ युक्तिवाद झाला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला.
त्यावेळी चव्हाण आणि बेलदार यांच्यात जोरदार वादावादी झाली. एकतर्फी निर्णय दिल्याचा आक्षेप नोंदवत चव्हाण यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन कार्यालय सोडले.
आर. डी. पाटील यांचीही संधी हुकली
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राम दादोबा ऊर्फ आर. डी. पाटील यांनाही एक जबरदस्त धक्का बसला. शिवाजी उद्यमनगर प्रभागातून निवडणूक उमेदवारी अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी निर्धारित वेळेत म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल केला नाही म्हणून आर. डी. पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्या विरोधकांनी हरकत घेतली होती. बुधवारी छाननीच्यावेळी दुपारी एक वाजल्यापासून पाटील यांच्या वतीने अॅड. राजेंद्र किंकर व अॅड. शिवप्रसाद वंदुरे-पाटील यांनी बाजू मांडली; परंतु शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटील यांचा अर्ज अवैध ठरविला. दुर्दैवाने आर. डी. पाटील यांचे बंधू सुनील दादोबा पाटील यांचाही अर्ज अवैध ठरला. त्यामुळे या प्रभागातून भाजपचे उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगदाळे हॉल कार्यालयातून राधिका भालकर व माधुरी गुरव (तवनाप्पा पाटणे हायस्कू ल) यांचे अर्ज अवैध ठरले.
नीलेश देसार्इंचा मार्ग मोकळा
कसबा बावडा क्षेत्रीय कार्यालयात पाच उमेवारांचे अर्ज अवैध ठरिवले. त्यामध्ये संजय चांदणे (शुगर मिल), भरत सुतार (हनुमान तलाव), प्रथमेश कात्रज (लक्ष्मी-विलास पॅलेस), भाग्यश्री मोहिते (सर्किट हाऊस) आणि मंगल आदमाने (कदमवाडी) यांचा समावेश आहे. चांदणे यांचा अर्ज दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने, तर सुतार यांचा अर्ज जातीचा दाखला सादर न केल्यामुळे अवैध ठरला. अन्य तीन अर्ज अपूर्ण कागदपत्रांमुळे अवैध ठरले. माजी नगरसेवक नीलेश देसाई यांच्या उमेदवारी अर्जावरही अॅड. किरण पाटील यांनी हरकत घेतली होती. मालमत्ता विवरण पत्रात चुकीची माहिती दिल्याचा त्यांचा आक्षेप होता; परंतु युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तो वैध ठरविला गेला. यामुळे देसाई यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भोसले, घोडके यांचेही अर्ज अवैध
दुधाळी पॅव्हेलियन क्षेत्रीय कार्यालयात शौर्यशीला राजन भोसले या सिद्धाळा प्रभागातील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. भोसले यांच्या अर्जावर सूचक झालेल्या व्यक्तीने अन्य एका उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली होती. त्यामुळे भोसले यांचा अर्ज अवैध ठरला. जवाहरनगर प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या महादेव गणपती घोडके यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र न सादर केल्यामुळे अवैध ठरला.