पन्हाळ्याच्या रेडेमहालमध्ये उंदीर, घुशींचा डेरा

By Admin | Updated: September 1, 2015 22:49 IST2015-09-01T22:49:33+5:302015-09-01T22:49:33+5:30

इमारतीतच धान्याचे दुकान : नगरपरिषदेसह, जनता बझार प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष

Rats in the Panhala Reedamahal, Urushi camp | पन्हाळ्याच्या रेडेमहालमध्ये उंदीर, घुशींचा डेरा

पन्हाळ्याच्या रेडेमहालमध्ये उंदीर, घुशींचा डेरा

नितीन भगवान - पन्हाळा ऐतिहासिक इमारतीत स्वस्त धान्य दुकान थाटल्याने परिसर, दुकानात उंदीर-घुशींच्या सुळसुळाटाने ऐतिहासिक ‘रेडेमहाल इमारतीस’ धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या ताब्यात असलेली ही इमारत जनता बझार या सहकारी संस्थेला लोकांची सोय व्हावी या उद्देशाने रेशन धान्य दुकानासाठी ही जागा नाममात्र भाड्याने देण्यात आली. या जागेची संस्था योग्य देखभाल करीत नसल्याने नगरपरिषदेच्या लक्षात आल्यानंतर जागा रिकामी करण्यास सांगितले; पण जनता बझार सहकारी संस्थेने अन्य ठिकाणी जागा मिळत नसल्याचे कारण दाखवत ही बाब न्यायप्रविष्ठ केली. गेली २० वर्षे हा वाद सुरू आहे. या काळात नगरपरिषद जनता बझार प्रशासनाकडून इमारतीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने आता ही इमारत केवळ उंदीर-घुशींचे निवासस्थान झाले आहे.‘रेडेमहाल’ ही ऐतिहासिक इमारतीजवळच असणाऱ्या बाले किल्ल्यात गडावरील प्रमुख व्यक्तीस किंवा किल्लेदार अथवा राजांच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांचे विश्रांतीस्थान होते. कालांतराने या इमारतीस रेड्यावरून धान्य आणलेल्या रेड्यांना बांधण्याचे ठिकाण झाले होते. म्हणून हा ‘रेडे महाल’ नावाने ओळखला जातो. छत्रपती ताराराणीच्या काळात कैद्यांना साखळदंडाने बांधण्याचे ठिकाण, पण नक्षीदार दोन मजली इमारतीची आतील रचना पाहता ही निवासी इमारत असावी आणि तो ‘डेरे महाल’ असावा, असा इतिहासतज्ज्ञांचा दावा आहे.आज ही ऐतिहासिक इमारत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या जनता बझार सहकारी ही संस्था अस्तित्वहीन अवस्थेत आहे. मग इमारत शाबूत ठेवायची असेल, तर इतिहासप्रेमींनी जागृत होऊन येथील हे धान्य दुकान हलविले पाहिजे. नाहीतर ही इमारत केवळ फोटोत पाहावयाची वेळ येणार आहे.
‘रेडे महाल’ या ऐतिहासिक इमारतीबाबत जनता बझार व पन्हाळा नगरपरिषद यांच्यामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे. इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात येताच त्याची उत्तम देखभाल करण्यास नगरपरिषद सक्षम आहे.
- असीफ मोकाशी, नगराध्यक्ष
पुरातत्त्व खात्याने नगरपरिषदेने इमारत ताब्यात घ्यावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे.
- नासीर शहा, विभागीय अधीक्षक, पन्हाळा पुरातत्त्व विभाग

Web Title: Rats in the Panhala Reedamahal, Urushi camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.