रत्नागिरी, सोलापूर, बीडची विजयी सलामी
By Admin | Updated: December 21, 2015 00:30 IST2015-12-20T23:52:26+5:302015-12-21T00:30:03+5:30
राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा

रत्नागिरी, सोलापूर, बीडची विजयी सलामी
वारणानगर : येथे खेळल्या जात असलेल्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात रत्नागिरी, सोलापूर, बीड, नाशिक संघाने, तर मुलींच्या गटात अहमदनगरसह सोलापूर, मुंबई संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवीत विजयी सलामी दिली. येथील श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाने पुरुष व महिला गटांच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. येथील तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी व तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या क्रीडागंणावर दिवसा व रात्री प्रकाशझोतात या स्पर्धा खेळल्या जात आहेत. रविवारी साखळी सामने खेळण्यात आले. मुलांच्या गटात नाशिक विरुद्ध हिंगोली यांच्यात २४-६ असा सामना होऊन नाशिकने १८ गुणांची आघाडी घेत विजयी सलामी दिली. नाशिकच्या विनोद वाणी याने सहा गुण, तर हिंगोलीच्या पुरोहित सुकेशने सहा गुण मिळविले. बीड विरुद्ध अहमदनगर यांच्यात झालेल्या सामन्यात बीडने सर्वाधिक गुणांची कमाई करीत ७२-२९ असा सहज विजय मिळविला. बीडच्या सय्यद एसने १५ गुण नोंदविले, तर नगरच्या मयूरेश भापकर याने आठ गुणांची नोंद केली. याच गटात सोलापूर विरुद्ध परभणी यांच्यात ५३-१९ असा सामना होऊन सोलापूरने ३४ गुणांनी विजयी सलामी दिली. सोलापूरच्या हर्षद शेखने १४ व निखील टिळे याने १२ गुणांची कमाई केली. परभणीच्या रवी पाटोळेने आठ गुण नोंदविले. रत्नागिरी विरुद्ध चंद्रपूर यांच्या ४५-२२ असा सामना झाला. यात रत्नागिरीने २३ गुणांनी हा सामना जिंकला.
मुलींच्या गटात सोलापूर विरुद्ध सिंधुदुर्ग यांच्यात ४०-९ असा सामना झाला. सोलापूरने ३१ गुणांनी एकतर्फी सामना जिंकला. सोलापूरची रकन्दा मिरगू हिने ११ गुण नोंदविले, तर मुंबई साऊथ ईस्ट विरुद्ध ठाणे यांच्यात ५५-१८ असा सामना झाला. मुंबई साऊथ ईस्टने ३७ गुणांनी हा सामना जिंकला.महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, सचिव कृष्णन मुथुकु, ललीत नाहटा, सरदार मोमीन, आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सर्व खेळाडूंचे स्वागत केले. (वार्ताहर)