रत्नागिरी, सांगलीला विजेतेपद

By Admin | Updated: November 27, 2015 01:24 IST2015-11-27T01:16:38+5:302015-11-27T01:24:33+5:30

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : पालघर, मुंबई उपनगर यांना उपविजेतेपद

Ratnagiri, Sangli winners | रत्नागिरी, सांगलीला विजेतेपद

रत्नागिरी, सांगलीला विजेतेपद

सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर विलास रांगणेकर क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने झालेल्या
४२ व्या कुमार व कुमारी गट अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात रत्नागिरी, तर कुमारी गटात सांगली संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रामविकास, अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे गृहनिर्माण व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार किरण पावसकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पात्रेकर, प्रभारी सचिव संभाजी पाटील, शशिकांत नेवगी उपस्थित होते.
कुमार गटातील अंतिम सामन्यात नवख्या पालघर संघाला ३१-१० असे नमवीत रत्नागिरीने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कुमारी गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यात सांगली संघाने मुंंबई उपनगर संघाला १०-८ असे नमवीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत राहिला. शेवटी पाच-पाच रेडची संधी देण्यात आली. पहिल्या संधीत दोन्ही संघांनी समान गुण मिळविले, तर दुसऱ्या रेडमध्ये सांगली संघाने घेतलेली सरशी विजेतेपदाला गवसणी घालणारी ठरली.
सांगली संघामार्फत स्नेहा सांगलीकर, प्राजक्ता ढोंबरे, मेघाराणी खोत, पल्लवी जाधव व सायली कुंभार यांनी, तर मुंबई उपनगरच्या सायली जाधव, पूजा जाधव, निकिती उत्तेकर, दीपा बोर्डे व तृप्ती सोनवणे यांनी शेवटच्या पाच-पाच रेड करत खेळात रंगत आणली.
या स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी शशी नेवगी, दिनेश चव्हाण, तुषार साळगावकर, शैलेश नाईक, संजय पेडणेकर, मार्टिन आल्मेडा, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Ratnagiri, Sangli winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.