आकर्षक क्रमांकांतून ‘आरटीओ’ला साडेदहा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:41 IST2019-05-06T00:41:42+5:302019-05-06T00:41:47+5:30
कोल्हापूर : बाजारात नवीन वाहन, कोणत्याही कंपनीचे अथवा लाखो ते कोट्यवधी किमतीचे येऊ दे; ते कोल्हापूर, सांगली, सातारा या ...

आकर्षक क्रमांकांतून ‘आरटीओ’ला साडेदहा कोटी
कोल्हापूर : बाजारात नवीन वाहन, कोणत्याही कंपनीचे अथवा लाखो ते कोट्यवधी किमतीचे येऊ दे; ते कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांतील रस्त्यांवर हमखास दिसणारच, ही जशी खासियत या जिल्ह्यांची आहे, तशीच आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये मोजणारेही याच शहरांतून पाहण्यास मिळतील. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आकर्षक वाहन क्रमांकापोटी यंदा कोल्हापूर प्रादेशिक परिवहनकडून सुमारे साडेदहा कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
वाहन अगदी हजारातील असो अथवा लाखातील; त्याला क्रमांक मात्र आपल्या आवडीचा आकर्षक असाच हवा, असा अट्टहास कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांतील वाहनप्रेमींतून केला जातो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपये केवळ या आकर्षक क्रमांकापोटी जमा होत आहेत.
यंदा कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कºहाड या चार उपप्रादेशिक कार्यालयांकडून १५ हजार ४३१ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकांपोटी तब्बल १० कोटी ५४ लाख १६ हजारांचा महसूल जमा केला आहे. यात विशेष म्हणजे १, ७, ९, ११, १५, ११११, ३३३३, ९९९१, ५७५७, ९९९९, १२३४, असे एक ना अनेक क्रमांक एकाच वेळी अनेकांना हवे असतात. अशा वेळी त्या क्रमांकांसाठी प्रादेशिक परिवहन लिलाव जाहीर करते. त्यातून त्या क्रमांकांवर बोली लावली जाते. त्यात सर्वाधिक किंमत मोजणाºयास तो क्रमांक दिला जातो. अशा प्रकारे प्रत्येक नव्या सीरियलच्या सुरुवातीस या क्रमांकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लिलाव जाहीर करते.
त्यानुसार मिळणारे उत्पन्न त्या-त्या प्रादेशिक परिवहनच्या महसुलात जमा होते.
अशा प्रकारे उत्पन्नात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. नव्या सीरियलप्रमाणे येणारा क्रमांक वाहनधारकास नको असेल तर त्यासाठी जंपिंगची सुविधाही कार्यालयाने केली आहे. त्यात तीन हजार रुपयांचे शुल्क मोजावे लागतात.
हव्या त्या क्रमांकापोटी मोजले चार लाख
यंदाही कोल्हापूर जिल्ह्यातून आकर्षक क्रमांकांपोटी झालेल्या लिलावात एका क्रमांकासाठी एका वाहनधारकाने तब्बल चार लाख रुपये मोजले आहेत; तर २० ते ५० हजार रुपयांच्या किमतीच्या क्रमांकापोटी ६५७ जणांनी १ कोटी ७६ लाख १० हजार रुपये व १ लाख ते २.५ लाख रुपये किमतीच्या क्रमांकापोटी नऊजणांनी १४ लाख १० हजारांचा महसूल जमा केला आहे. या क्रमांकापोटी लाखो रुपये मोजण्याची खासियत कोल्हापूरकरांनी आजही जपली आहे. त्यामुळे महसुलात वाढ होत आहे.
वर्षभरात जमा झालेला महसूल
कार्यालय वाहनधारक महसूल
संख्या
कोल्हापूर १०,४८७ ७ कोटी ४ लाख ७४ हजार
सांगली ५१८ ३६ लाख ५० हजार
सातारा ४,४२६ ३ कोटी १२ लाख ९२ हजार
एकूण १५, ४३१ १० कोटी ५४ लाख १६ हजार