आरोग्य उपसंचालक कार्यालयात निघतोय बदल्यांसाठी दर; पाच जणांची टोळी कार्यरत : राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतली दखल; चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:32+5:302021-09-19T04:24:32+5:30

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची ...

Rates for transfers to the office of Deputy Director of Health; Gang of five working: Minister of State Yadravkar takes notice; Will investigate | आरोग्य उपसंचालक कार्यालयात निघतोय बदल्यांसाठी दर; पाच जणांची टोळी कार्यरत : राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतली दखल; चौकशी करणार

आरोग्य उपसंचालक कार्यालयात निघतोय बदल्यांसाठी दर; पाच जणांची टोळी कार्यरत : राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतली दखल; चौकशी करणार

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या शिफारस पत्रालाही केराची टोपली दाखविली जात आहे. या कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, यात मंजूर पदसंख्या ३९१४ असून, त्यापैकी २५९२ भरली असून, १३२२ पदे रिक्त आहेत. या देवघेवीची दखल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व आरोग्य संचालकांनीही घेतली आहे. त्याच्या चौकशीचे आदेश सोमवारी दिले जातील, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गतवर्षी कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या बदल्या करण्याचे काम सध्या सुरू असून, यामध्ये प्रत्येक पदासाठी दर ठरले होते. त्यानुसार ज्यांनी ठरलेले पैसे दिले त्याच्याच बदल्यांचे प्रस्ताव करून ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. यासाठी ही साखळी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय ‘भावना’पासून सुरू होते. शशीपासून बिडाच्या भाल्यापर्यंत चार ते पाच जणांची यंत्रणा कामाला लागते. ऑर्डर येण्याअगोदरच पैशासाठी या यंत्रणेचा तगादा सुरू होतो. चष्मेवालाही त्यात सहभागी असतो.

चालक बदलासाठी ५० हजार दर निश्चित झाला होता. मात्र, त्या बदल्याच रद्द झाल्याने केलेल्या कामावर पाणी फिरले. शिपाई व क्लार्क पदासाठी ४० ते ५० हजार, टेक्निशियन पदासाठी ६० ते ७० हजार त्याचबरोबर नर्सेस बदल्या व पदोन्नतीसाठी ७० ते ७५ हजार, असे दर ठरल्याची उघडपणे चर्चा सुरू आहे.

याच यंत्रणेकडून विनंती बदल्यासाठी कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील मंत्र्यांचे शिफारस पत्र आणायला सांगितले. मात्र, त्या पत्राला केराची टोपली दाखवीत ठरल्याप्रमाणे दर काढून वसुली केल्याचे समजते. जे कर्मचारी पैसे देण्यासाठी तयार झाले त्यांचेच प्रस्ताव तयार करून आरोग्य संचालकांना सादर करून त्यावर सह्या घेऊन ऑर्डर काढण्यात आल्या. पुण्यात सही झाल्याबरोबर दुसऱ्या मिनिटापासून कोल्हापुरातील यंत्रणा वसुलीला लागली.

अजून पदोन्नती शिल्लक..

या बदल्यांनंतर कार्यालयांतर्गत शिपाई ते कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते सहायक अधीक्षक ते अधीक्षक अशी पदोन्नती शिल्लक असून, यात शिपाई ते कनिष्ठ लिपिकसाठी शहरात हवे असल्यास १ लाख दर काढल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत आहे.

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतील भावना चौधरी, शशिकांत सणगर, गौरव भोसले, हुसेन भाले व लोखंडे यांच्या साखळीबाबत माझ्याकडेही लेखी तक्रारी आल्या असून, त्यांच्या चौकशीचे आदेश सोमवारी देणार आहे.

राजेंद्र यड्रावकर,

आरोग्य राज्यमंत्री

-------------

आरोग्य उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या साखळीची चौकशी त्याच विभागातील अधिकाऱ्यांमार्फत न होता त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून व्हावी. इतरही कार्यालयांतील अशी चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे.

अनिल लवेकर

सरचिटणीस

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

---------------

Web Title: Rates for transfers to the office of Deputy Director of Health; Gang of five working: Minister of State Yadravkar takes notice; Will investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.