फुलांच्या आवकेबरोबर दरातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:42+5:302021-09-13T04:22:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आवक चांगली असली तरी दरात वाढ ...

फुलांच्या आवकेबरोबर दरातही वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आवक चांगली असली तरी दरात वाढ झाली असून झेंडूच्या दरात किलो मागे वीस रुपयांची वाढ दिसत आहे. भाजीपाला, कडधान्य मार्केट स्थिर असून साखर काहीसी वधारली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर करताच गोडे तेलाच्या दरात घसरू लागले आहेत. सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी घसरण झाली आहे.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे फूल शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मध्यंतरी फुलांची आवक कमी झाली होती. गणेशोत्सवामध्ये फुलांची आवक वाढली आहे. आवकेबरोबर मागणीही वाढल्याने दरात काहीसी वाढ झाली आहे. भगव्या झेंडूच्या दरात किलो मागे वीस रुपयांची वाढ झाली आहे. पेपर शेवंती दोनशे रुपये किलो आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कोबी, ओली मिरची, घेवडा, कारल्याच्या दरात घसरण दिसत आहे. घाऊक बाजारात कारल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून साडेचार रुपये किलोने विक्री होत आहे. कोबी साडेतीन रुपये तर घेवडा आठ रुपये किलो आहे. दोडका, ढब्बू, टोमॅटोच्या दरात काहीसी वाढ दिसते. इतर भाजीपाल्याचे दर तुलनेत स्थिर आहेत. मेथी, पालक व पोकळ्याचा दर स्थिर आहे.
डाळीचे दर स्थिर आहेत, गणेशोत्सावामुळे हरभरा डाळ व गुळाची मागणी वाढली होती. साखरेचा दर ४० रुपये किलो झाला आहे. केंद्र सरकारने तेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सरकी तेलाच्या दरात तीन ते चार रुपये कमी झाले आहेत. फळ मार्केटमध्ये सफरचंद, सीताफळ, डाळिंब, चिक्कू या फळांची रेलचेल सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात फारसा फरक दिसत नाही.
मका कणसाची गोडी वाढली
मका कणसाची (स्वीट कॉर्न) आवक वाढली आहे. पावसाळी हवामानामुळे कणसाची मागणीही वाढली आहे. तरीही घाऊक बाजारात साडेचार रुपये कणसाचा दर आहे.
शेपूने बाजार फुलला
शेपूची भाजी व भाकरी गौरीची शिदोरी म्हणून वाटली जाते. त्यामुळे रविवारी शेपूच्या भाजीची आवक जास्त होती. बाजार समितीत ६१ हजार पेंढ्याची आवक झाली होती, दर मात्र सरासरी ४ रुपये राहिला.
(फोटो ओळी स्वतंत्र देतो...)