शालेय साहित्याचे दर स्थिर

By Admin | Updated: May 11, 2015 23:48 IST2015-05-11T23:35:11+5:302015-05-11T23:48:56+5:30

सामान्यांना शिक्षण महाग : संस्थांच्या शुल्कामध्ये मात्र घसघशीत वाढ

The rate of school literature is stable | शालेय साहित्याचे दर स्थिर

शालेय साहित्याचे दर स्थिर

रत्नागिरी : शाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवधी असला तरी शालोपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी सुरू केली आहे. खासगी शिक्षण संस्थांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्कामध्ये घसघशीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना शिक्षण महाग झाले आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर बहुतांश पालक शैक्षणिक साहित्य खरेदीला सुरूवात करतात. काही पालक शाळा सुरू होण्यापूर्वी खरेदी करतात. मात्र, त्याच दरम्यान दुकानातून खचाखच गर्दी असते. त्यातच पुस्तके मिळत नसल्याने पालकांना सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही. नामवंत कंपन्यांच्या वह्यांना विशेष मागणी दिसून येत आहे. नवनीत, स्मार्ट, क्लासमेट कंपन्यांच्या वह्यांचा खप अधिक आहे. बहुतांश वह्यांचे पृष्ठ कव्हर ब्राऊन कलरचे आहेत, तर काही वह्यांच्या कव्हरवर फुले अथवा प्राण्यांची चित्र दिसून येत आहेत.
कंपास बॉक्स, पाण्याची बाटली, टिफीन आदी प्लास्टिक साहित्याच्या किमती स्थिर आहेत. मात्र, शालेय बॅग, स्केचपेन, रंगपेट्या, कव्हर्स, स्टीकर्स यांच्या किमतीतही पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्कूल बॅग, स्टीकर्समध्ये बेनटेन, बार्बी डॉल, अ‍ॅग्रीबर्डला विशेष मागणी होत आहे.
गतवर्षी इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम बदलल्याने या वर्गाची पुस्तके उशिरा उपलब्ध झाली होती. यावर्षी पाचवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. पहिली ते चौथीची सर्व विषयांची व माध्यमांची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पाचवीची पुस्तके अजून यायची आहेत. मात्र, अन्य वर्गांची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.
बहुतांश पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. शहरातील नामवंत शैक्षणिक संस्थांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. केजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकवर्ग शाळेत खेटे मारत आहे. शाळा प्रवेश देण्यासाठी इमारत बांधकाम निधी म्हणून डोनेशन घेण्यात येते. २० ते २५ हजार रूपये पालकांकडून घेण्यात येत आहेत. प्रवेश मिळवण्यासाठी पालक देण्यास तयार होत आहेत. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ यानुसार पालक गप्प बसत आहेत. याशिवाय दरमहा आकारण्यात येणाऱ्या मासिक शैक्षणिक शूुल्कामध्ये १०० ते २०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा विचार करता शैक्षणिक खर्चात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांसाठी शिक्षण महागले आहे. (प्रतिनिधी)

निकाल लागल्यापासून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकवर्ग येत आहे. सध्या गर्दी नसली तरी बऱ्यापैकी ग्राहक आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गर्दीत वाढ होईल. यावर्षी इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने या वर्गाची पुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. सध्या छपाईचे काम सुरू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत शैक्षणिक साहित्याच्या किमती बऱ्यापैकी स्थिर राहिल्या आहेत.
- गिरीश तावडे, ओमेगा स्टेशनरी, रत्नागिरी.


शैक्षणिक साहित्यामध्ये फारशी वाढ झाली नसली तरी शैक्षणिक संस्थांनी मात्र घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे साहित्याचे दर स्थिर असले तरी पालक शैक्षणिक संस्थांच्या कृपेने भरडला जाणार आहे. पालकांचा ठराविक संस्थेतच पाल्याला घालण्याचा अट्टाहास असल्याने संस्थांचे फावले आहे.

Web Title: The rate of school literature is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.