आमशी येथे दोन गटांत राडा
By Admin | Updated: July 21, 2014 00:39 IST2014-07-21T00:37:54+5:302014-07-21T00:39:28+5:30
घरकुल यादीत नाव नसल्याच्या कारण

आमशी येथे दोन गटांत राडा
सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथे घरकुल यादीत नाव नसल्याच्या कारणावरून दोन गटांत राडा झाला. यामध्ये ग्रामपंचायत लिपिक व उपसरपंचांना मारहाण करून दप्तर विस्कटले. त्यानंतर उपसरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदारांच्या घरातील प्रापंचिक साहित्य विस्कटले. यावेळी झालेल्या मारामारीत सरदार कांबळे जखमी झाले. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक विक्रम सावंत हे काम करीत बसले होते. यावेळी सरदार कांबळे व विष्णू तांबेकर हे दोघे घरकुल योजनेची माहिती घेण्यासाठी आले. त्यांनी घरकुल यादीत माझे नाव का नाही? असा जाब विचारत लिपिकावर अरेरावी केली. यावर सावंत म्हणाले, सायंकाळचे सहा वाजले आहेत. ही कार्यालयीन कामाची वेळ नाही. तुम्ही उद्या या. परंतु, कांबळे व तांबेकर यांनी, माझे नाव राजकीय कारणावरून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. माझे नाव याच यादीत पाहिजे, असे म्हणत लिपिक सावंत यांना मारहाण करून कार्यालयातील दप्तर विस्कटले. यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील तेथे आले. त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरदार कांबळे व विष्णू तांबेकर यांनी उपसरपंचांनाही मारहाण केली. सरपंच कार्यालयातील टेबल खुर्चीचीही मोडतोड केली. त्यानंतर उपसरपंच पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरदार कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली व प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली. यामध्ये कांबळे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर येथे नेण्यात आले. यावेळी कांबळे यांनी पोलिसांत उपसरपंच प्रकाश पाटील, सरदार पाटील, कृष्णात पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)