कोथळीत आढळला दुर्मीळ वीरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:02 AM2019-04-22T01:02:31+5:302019-04-22T01:02:36+5:30

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर ...

The rare winters found in Kothali | कोथळीत आढळला दुर्मीळ वीरगळ

कोथळीत आढळला दुर्मीळ वीरगळ

Next

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला आहे. १२व्या शतकातील हा वीरगळ असून, कोथळी गावातील दोरय्या यांचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे या वीरगळ लेखात म्हटले आहे.
प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात, त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. अशा वीरगळावर संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात सदर वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेले असते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते.
महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मीळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहार राजवटीतील आहे.
इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. या वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात कल्लेश्वराच्या मंदिरात एक वीरगळ आढळून आला. मंदिरात एका भिंतीला टेकून तीन वीरगळ ठेवले आहेत. स्त्रियांच्या रक्षणासाठी कोथळीच्या वीराने आपले सर्वोच्च बलिदान दिले. स्त्रीरक्षणार्थ मरण पावलेल्या वीराचा वीरगळ हा महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. अक्षराच्या वळणावरून आणि लेखनशैलीवरून तो १२ व्या शतकातला असावा असे अनुमान करता येते. या वीरगळ अभ्यासासाठी हम्पी विद्यापीठाचे शीलालेखतज्ज्ञ डॉ. कणवीर मन्वाचारी, बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), अमोल चिकोडे, गणेश जंगम, कुमार सुतार यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने दक्षिण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.

शिलालेख ‘हळेकन्नड’मध्ये
हा विरगळ हळेकन्नड लिपीत आहे. अडीच फूट ऊंच आहे. खालील भागात एक वीर पुरुष ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना आहे. वीराच्या मागे स्त्री दर्शवली आहे. कलशाकृती भागावर ध्वज आहेत. त्यानंतर टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. या लेखात कोथळी गावातील दोरय्याचा मुलगा मल्लयन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे.

Web Title: The rare winters found in Kothali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.