म्हातारीच्या पठारावर सापडले दुर्मीळ औषधी वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:54+5:302021-09-23T04:26:54+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध म्हातारीच्या पठारावर कोंबड्यांच्या मानमोडी आजारावर उपयुक्त असणारे भात पिकाचे औषधी ‘देवभात’ नावाचे जंगली वाण ...

म्हातारीच्या पठारावर सापडले दुर्मीळ औषधी वाण
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध म्हातारीच्या पठारावर कोंबड्यांच्या मानमोडी आजारावर उपयुक्त असणारे भात पिकाचे औषधी ‘देवभात’ नावाचे जंगली वाण वन विभागाचे वनपाल अमोल चव्हाण, बेगवडेचे वनरक्षक किरण पाटील व वनमजूर दत्ता जाधव यांना सापडल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. म्हातारीच्या बटव्यात सापडणारी औषधी जडीबुटी पिढ्यान्पिढ्या प्रसिद्ध आहे; पण या म्हातारीच्या पठारावर सापडलेली दुर्मीळ वनौषधी हा दुर्मीळ दैवदुर्लभ असा योगायोग आहे.
याबद्दल माहिती देताना वनपाल अमोल चव्हाण म्हणाले की, भुदरगड तालुक्यातील किल्ले भुदरगडच्या दक्षिण बाजूचा विस्तीर्ण म्हातारीचा पठार हा भाग जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील वन्यजिवांचे हे विहाराचे पठार आहे. नेमक्या याच पठारावर हे देवजातीचे भाताचे जंगली वाण जंगलभ्रमंतीत आम्हाला सापडले. सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर फार कमी ठिकाणी अतिपावसाच्या प्रदेशात हे जंगली वाण पाणथळीला सापडते. हे देवभात जातीचे वाण नामशेष झाले आहे. क्वचितच हे आजच्या पाहणीत आढळले. याचे बियाणे शेतात लावता येत नाहीत. फक्त जंगली भागाच्या या पठारावर ते नैसर्गिकरीत्या उगवते. कोंबड्यांना येणाऱ्या मानमोडी आजारावर याचा प्रामुख्याने औषध म्हणून उपयोग केला जातो. पूर्वजांनी अनेक व्याधींवर या देव नावाच्या जंगली भातपिकाचा उपयोग करून घेतला. मात्र अलीकडच्या चाळीसएक वर्षांत हे जंगली वाण नष्ट झाले. या भाताच्या लोंबांवर कुसळे असल्याने कोणतेही प्राणी या पिकांना तोंड लावत नाहीत. जंगलांना लावल्या जाणाऱ्या वणव्यात अनेक दुर्मीळ वनौषधींचा नायनाट होत आला आहे. यामध्ये या वाणाचाही नाश होत आला आहे. देवभात नावाचे जंगली वाण आढळल्यास हा परिसर उन्हाळ्यात आगीपासून संरक्षित करा, असे आवाहन वनपाल अमोल चव्हाण यांनी केले.
या दुर्मीळ वनौषधी देवभात वाणाचा शोध लावला म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर यांनी सर्वांना शाबासकी दिली असून, लोकांना आपल्या तालुक्यातील दुर्मीळ वनस्पतींची जोपासना होण्यासाठी उन्हाळ्यात जंगलांना आगी न लावण्याचे आवाहन केले आहे.
म्हातारीच्या पठारावर सापडलेले दुर्मीळ देवभात वाण.