‘रोड ट्रान्स्पोर्ट अँड सेफ्टी बिल’विरोधात तीव्र आंदोलन
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:14:00+5:302014-12-09T00:26:02+5:30
जयप्रकाश छाजड : एसटी वर्कर्स काँग्रेसचा विधेयकास विरोध

‘रोड ट्रान्स्पोर्ट अँड सेफ्टी बिल’विरोधात तीव्र आंदोलन
कोल्हापूर : केंद्र शासनातर्फे ‘रोड ट्रान्स्पोर्ट अॅँड सेफ्टी बिल २०१४’ हा नवा कायद्या अमलात आणला आहे. या कायद्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होणार असल्याने संघटनेमार्फत याला जोरदार विरोध करण्यात येणार आहे. तसेच कामगार कायदे मोडीत काढून परदेशी व देशी भांडवलदारांना सवलती देण्यासाठी भाजप सरकार कामगारांची गळचेपी करत आहे. त्याविरोधातही जनजागृती करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजड यांनी केले.
दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आज, सोमवारी संघटनेचा विभागीय मेळावा व माजी विभागीय अध्यक्ष सयाजीराव घोरपडे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
छाजड म्हणाले, रोड ट्रान्स्पोर्ट अँड सेफ्टी बिलामुळे खासगी प्रवासी वाहतूक व एस. टी.सारख्या सार्वजनिक वाहतुकीची गणना एकसारखी होणार आहे. सध्या टप्पा वाहतूक ही फक्त एस.टी. महामंडळ करीत आहे; परंतु नव्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीने खासगी प्रवासी वाहतुकीलाही टप्पेनिहाय वाहतुकीसाठी नियमित मार्ग मिळणार आहेत. तसेच हे परवाने निविदेने दिले जाणार असल्याने त्याचा एसटी महामंडळाला फटका बसेल. म्हणून कायद्याला आमचा विरोध असून, तीव्र आंदोलन केले जाईल.
याप्रसंगी सेवानिवृत्त सयाजीराव घोरपडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष आनंदराव दापोरे, बंडोपंत वाडकर, अॅड. गुलाबराव घोरपडे, मुखेश टिगोटे, डी. ए. बनसोडे, डॉ. विलास पोवार, सदाशिव पाटील, बापूसो पाटील, सुनील पंडित, आदी उपस्थित होते.