रंकाळ्याची घाण आता पंचगंगेत
By Admin | Updated: July 5, 2014 01:06 IST2014-07-05T01:00:54+5:302014-07-05T01:06:13+5:30
ड्रेनेज लाईनचे उद्घाटन : १० एमएलडी मैलामिश्रीत सांडपाणी दुधाळी नाल्याद्वारे मिसळणार नदीत

रंकाळ्याची घाण आता पंचगंगेत
कोल्हापूर : रंकाळ््यात मिसळणारे शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला आदी मिळून ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे आज शुक्रवारपासून वळविण्यात आले. महापौर सुनीता राऊत यांच्या हस्ते बहुचर्चित ड्रेनेजलाईनच्या कामाचे उद्घाटन झाले. या योजनेमुळे रंकाळ्याचे दुखणे कमी होणार असले तरी हे पाणी आता दुधाळी नाल्याद्वारे थेट पंचगंगेत मिसळणार असल्याने प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या पंचगंगेच्या दुखण्यात आणखी भरच पडणार आहे.
रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून होत असलेली ही ४ कोटी २५ लाख रुपयांची ही योजना साडेचार वर्षे रखडली होती. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे ऐतिहासिक रंकाळा तलावाचे दुखणे वाढतच गेले. मैलामिश्रीत पाणी थेट मिसळत असल्याने तलाव्याचे पाणी हिरवट झाले. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना अक्षरश: उलट्या येत होत्या. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कोल्हापूरचे वैभव असलेल्या या तलावाचा ड्रेनेज टॅँकच बनला होता. मात्र, या ड्रेनेज लाईनमुळे रंकाळा तलाव व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
रंकाळ्यात मिसळणारे हे सारे मैलामिश्रीत सांडपाणी या ड्रेनेजलाईनद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आले आहे. मात्र, दुधाळी नाला थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने आता रोज १० एमएलडी मैलामिश्रीत पाण्याची भर पंचगंगा नदीत पडणार आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आणखीनच गंभीर होणार आहे. दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून १७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र, हे केंद्र पूर्ण होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे समजते. तोपर्यंत रंकाळ्याचे दुखणे पंचगंगेला सोसावे लागणार आहे.