रंकाळा सोसतोय मरणकळा
By Admin | Updated: January 2, 2015 00:18 IST2015-01-02T00:01:31+5:302015-01-02T00:18:23+5:30
परिसरात पुन्हा दुर्गंधी : सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग बदलला

रंकाळा सोसतोय मरणकळा
कोल्हापूर : रंकाळ््यात शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला आदी मिळणाऱ्या सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग बदलू लागला आहे. रंकाळ्याच्या काळे-निळे झालेल्या पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. सांडपाण्यामुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोका वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वेळीच लक्ष न दिल्यास रंकाळ्याच्या दुरवस्थेत वाढ होण्याची शक्यता आहे.
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. गेली साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन पूर्ण होऊनही सांडपाणी पूर्ण क्षमतेने वहन होत नाही. त्यामुळेच रंकाळ्याचे दुखणे वाढत आहे.
दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचला आहे. मैलामिश्रित दुर्गंधीमुळे नागरिकांना जीव नकोसा होत आहे. दुर्गंधी, चिखल, डास आणि रस्ता बंद या परिस्थितीमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच ड्रेनेज लाईन बंद पडल्याने मिसळणाऱ्या सांडपाण्याचा ओघ ‘जैसे थे’ आहे. सांडपाणी वळविल्याचा दावा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. प्रशासनाच्या जुजबी प्रयत्नांमुळे रंकाळ्याला अवकळा आल्याने नागरिक व पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)