रंकाळा संवर्धन, विकासचे तीन टप्प्यांत आराखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:33+5:302021-06-17T04:17:33+5:30
कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसर विकसित करणे, जतन व संवर्धन करण्याच्या तीन टप्प्यांतील कामांचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयास सादर करण्यात ...

रंकाळा संवर्धन, विकासचे तीन टप्प्यांत आराखडे
कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसर विकसित करणे, जतन व संवर्धन करण्याच्या तीन टप्प्यांतील कामांचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयास सादर करण्यात येणार असून, त्यादृष्टीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी रंकाळा तलावाच्या परिसराची पाहणी केली.
रंकाळा परिसर विकसित करणे, जतन व संवर्धन करण्यासाठी १५ कोटींची सविस्तर आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे दि. ८ मार्च २०१९ रोजी व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे दि. १६ जानेवारी २०२० रोजी सादर करण्यात आला आहे. या सादर केलेल्या प्रस्तावावर पुणे पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालकांनी या पर्यटन स्थळाची पाहणी करून कामांच्या प्राधान्यक्रमानुसार महापालिकेने तीन टप्प्यांमध्ये अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार महापालिकेच्यावतीने प्रस्तावित कामे प्राधान्यक्रमानुसार तीन टप्प्यांमध्ये अंदाजपत्रके, आराखडे यांसह पुणे पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सुरत अंजली असोसिएटचे आर्किटेक्ट सुरत जाधव व कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे यांच्यासह याठिकाणी कोणकोणती कामे प्राधान्यक्रमानुसार करावयाची याबाबत रंकाळा तलाव परिसराची फिरती केली.
या पाहणीवेळी प्रशासक बलकवडे यांनी रंकाळा ही ऐतिहासिक वास्तू असलेने हेरिटेज नियमांची अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर तलावाच्या जैवविविधतेला बाधा न पोहचवता रंकाळा तलाव विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश शहर अभियंता सरनोबत यांना दिले.
फोटो क्रमांक - १६०६२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव परिसरात करण्यात यावयाच्या विकासकामांच्या अनुषंगाने बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सुरत जाधव, अनुराधा वांडरे उपस्थित होते.