श्रमदानातून रंकाळा परिसर चकचकीत

By Admin | Updated: October 16, 2015 23:24 IST2015-10-16T23:18:32+5:302015-10-16T23:24:15+5:30

शिवाजी विद्यापीठाची मोहीम : कुलगुरू, पोलीस अधीक्षकांसह सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे श्रमदान; दहा टन कचऱ्याचा उठाव

Rankal area shiny from labor | श्रमदानातून रंकाळा परिसर चकचकीत

श्रमदानातून रंकाळा परिसर चकचकीत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) सुमारे सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून शुक्रवारी रंकाळा तलाव परिसर स्वच्छ केला.
‘स्वच्छ भारत - स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या मोहिमेत इराणी खणीसह मोहिते खण, रंकाळा पदपथ, पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान, तसेच रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, काचेच्या बाटल्या, काटेरी झुडपे असा दहा टन कचरा जमा झाला. ही मोहीम अडीच तासांहून अधिक वेळ राबविण्यात आली.
मोहिमेसाठी सकाळी साडेआठ वाजता इराणी खण येथे विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी पोहोचले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते.
पूर्वनियोजनानुसार मोहिमेला सुरुवात झाली. यात खुरपे, खराटा, फावडे, आदी साहित्य घेऊन सर्वजण श्रमदान करीत होते. कचरा उचलणे, खराटा मारणे अशी कामे डॉ. शिंदे, डॉ. शर्मा हे करीत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. त्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. खणीतून प्लास्टिक पिशव्या, कचरा, विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व मुखवट्यांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. खणीच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा गोळा केला. शिवाय अनावश्यक काटेरी झुडपे साफ केली. मोहिमेअंतर्गत सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे २५ सफाई कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पालिकेतर्फे दोन डंपर, एक जेसीबी, पाण्याचा टँकर, दोन धूर फवारणी यंत्रे, पाच कीटकनाशक फवारणी यंत्रे, आदी सामग्री उपलब्ध करून देण्यात आली.
दरम्यान, मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता. यातील अनेकांनी स्वच्छतेसाठी हातात घेतलेला झाडू, बुट्टी, खुरपे, आदी कामे करीत असतानाच मोबाईलवरून ‘सेल्फी’ टिपला. (प्रतिनिधी)

ंमोहिमेत यांनी घेतला सहभाग
स्वच्छता मोहिमेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’ संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, वासंती रासम, भगवान माने, अमोल मिणचेकर, प्राचार्य एस. एस. गवळी, एच. एस. वनमोरे यांच्यासह शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, केएमसी, गोखले कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील शिक्षक, कर्मचारी व ‘एनएसएस’चे विद्यार्थी सहभागी झाले होते.


भविष्यात रंकाळ्याचे चिरतारुण्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून यापुढे देखील या ठिकाणी स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले मन तसेच पाणी कधीही गढूळ होऊ देता कामा नये. या गोष्टी जितक्या स्वच्छ व पारदर्शक ठेवाल, तितके आपले जीवन उत्तम व निरोगी पद्धतीने व्यतीत होईल.
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आवाहनानुसार ८ मे रोजी विद्यापीठाने स्वच्छता मोहीम सुरू आहे. गणेश विसर्जनानंतर इराणी खण परिसरातील स्वच्छता करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी मोहीम घेतली.
- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ
विद्यार्थी कल्याण मंडळ

Web Title: Rankal area shiny from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.