रंकाळा, परताळा बुजविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: April 10, 2015 00:34 IST2015-04-10T00:16:40+5:302015-04-10T00:34:51+5:30
महापालिकेचे दुर्लक्ष : रात्री खरमाती टाकण्याचे काम; बांधकाम व्यावसायिकांचे कृत्य, मनपाचे दुर्लक्ष

रंकाळा, परताळा बुजविण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा व रंकाळ्याचा श्वास असलेला परताळा परिसरात रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात खरमाती टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. परिसरातील बांधकाम व्यावसायिकांचे हे कृत्य असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने रंकाळाप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. रंकाळ्यातील दूषित पाण्याची पातळी कमी करण्यासाठी महापालिकेने आठ लाख रूपये खर्चून सांडव्याच्या बाजूला चर मारली. या चरीशेजारीच अज्ञातांनी तब्बल दहा ते बारा डंपर खरमाती आणून टाकली आहे. खरमाती टाकत असताना रंकाळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले तारेची कुंपणही तोडून काढले आहे. थेट रंकाळ्यातच खरमाती टाकल्याचे प्रकार अद्याप महापालिका प्रशासनास माहितीच नाही. परिसरात सुरू असलेल्या काही बांधकाम व्यावसायिकांचे कृत्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनास सर्व काही माहिती असूनही ‘झोपेचे सोंग’ घेत असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे.
थेट रंकाळ्यात खरमाती टाक ूनही कोणीही अटकाव केला नसल्याने संबंधितांचे धाडस आणखी वाढले. पुन्हा दहा ते बारा ट्रक खरमाती रंकाळ्याचा श्वास असलेल्या परताळ्याच्या कडेला आणून टाकली आहे. परताळा हे ‘ग्रीन झोन’ म्हणून महापालिका प्रशासनाने राखीव ठेवला आहे. रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरणाच्या कामी परताळा हे महत्त्वाचे अंग आहे. रंकाळ्याची पाण्याची पातळी तसेच जैववैविधता टिकविण्याचे महत्त्वाचे काम परताळ्यामुळे होते. परताळा परिसर खुला असल्यानेच या परिसरात उभ्या होत असलेल्या काँक्रिटच्या जंगलातही नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, जाणीवपूर्वक परताळा बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परताळा बुजवण्याचे हे कुटिल कारस्थान वेळीच हाणून पाडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
जयंती नाल्याशेजारील व नदीपात्रालगत रेडझोन क्षेत्र अशाच प्रकारे बुजविण्यात आल्याचे उदाहरण ताजे आहे. महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत बंदी असलेल्या क्षेत्रात भराव टाकून तो भाग उंच करून त्याजागी बहुमजली इमारतीही उभ्या राहिल्या. आता असाच प्रकार परताळ्याबाबत सुरू असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.
रंकाळा व परताळ्यात टाकलेल्या खरमातीची कल्पना महापालिका प्रशासनास तत्काळ दिली आहे. या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी नगरसेविका सुनीता राऊत यांच्या माध्यमातून सभागृहात आवाज उठवणार आहे.
- अजित राऊत, माजी नगरसेवक