कोल्हापूर : येथील महिलेविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करीत असल्याचा राग मनात धरून रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३२) यांचा बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरात खून केल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. विशाल बाबूराव घस्ते, आकाश ऊर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (रा. देवाळे, ता. करवीर), अजित उदय चुडेकर (रा. राजकपूर पुतळा, जुना वाशी नाका, कोल्हापूर), लक्ष्मी विशाल घस्ते (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी लक्ष्मी हिच्या विरूद्ध पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करतो म्हणून खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.पोलिसांनी सांगितले की, बेनाडे यांचा लक्ष्मी घस्ते हिच्याशी वाद होता. यातून बेनाडे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रार करीत होता. त्याचा राग मनात धरून सायबर चौकात बेनाडे यांचा १० जुलैला पाठलाग करून संशयित पाचही आरोपींनी त्यांना तवेरा गाडीत घातले.
वाचा - शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा
सीमा भागातील संकेश्वरात त्यांना नेले. तेथे तलवार, एडका, चॉपर या धारदार हत्याराने बेनाडे यांचे डोके, दोन्ही हातपाय धडापासून वेगळे करून अतिशय क्रूरपणे खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता.
बेपत्ताची वर्दीबेनाडे बेपत्ता झाल्याची वर्दी बहीण नीता उमाजी तडाखे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी १६ जुलै २०२५ रोजी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. पोलिस अधिक तपास करीत असताना या पाचही संशयितांनी बेनाडे याचा खून केल्याचे समोर आले.