रंकाळा टॉवर रस्त्याचे पांग फिटले
By Admin | Updated: November 20, 2014 00:00 IST2014-11-19T23:54:49+5:302014-11-20T00:00:42+5:30
पालिकेला आली जाग : पाटणकर हायस्कूल ते रंकाळा टॉवर रस्त्याच्या कामाला सुरुवात

रंकाळा टॉवर रस्त्याचे पांग फिटले
कोल्हापूर : रंकाळा बसस्थानक ते रंकाळा टॉवरच्या नवीन रस्त्याला अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला. आज, बुधवारपासून पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरपासून ते नागोजीराव पाटणकर हायस्कूलपर्यंतच्या नवीन रस्त्याचा कामास प्रारंभ झाला. गेल्या तीन आठवड्यांपासून शहरातील खराब रस्ते व त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी कंबरडे मोडणारे रस्ते अशी प्रतिक्रिया देत स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तब्बल हजारांहून अधिक मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण देणारा, शरीराची हाडं खिळखिळी करणारा, धुळीचे साम्राज्य निर्माण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा अशीच रंकाळा टॉवर रस्त्याची ओळख झाली होती. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली. ‘लोकमत’ने ‘खड्ड्यात गेलंय कोल्हापूर माझं’ या वृत्तमालिकेद्वारे २९ आॅक्टोबरला ‘रस्ता दाखवा; बक्षीस मिळवा’या शीर्षकाखाली या रस्त्याची किती दुरावस्था झाली आहे ते सचित्र मांडले होते. दरम्यान, या बातमीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नवीन रस्त्याच्या कामास आजपासून सुरुवात केली.
गेल्या १५ वर्षांपासून हा रस्ता खराब होता. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेतली असता हा रस्ता चार प्रभागात असल्याने तो महापालिका निधी व नगरसेवकांना मिळणाऱ्या विकास निधीमधून केला नसल्याचे समजले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी २०१० पासून लढा सुरू केला होता. त्यानंतर आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यासंदर्भात गाऱ्हाणे मांडले. यावेळी आयुक्तांनी ड्रेनेजसाठी सहा लाखांचा निधी दिला. ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याला कोणी वालीच राहिला नाही. हा रस्ता ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर आहे तसाच पडून राहिला. रंकाळा तालीम मंडळसह परिसरातील तालीम मंडळे, तरुण मंडळांनी निदर्शने, रास्ता रोको आदी मार्गांनी आंदोलने केली. महापालिकेसह पोलीस प्रशासनाला निवेदने दिली. यासाठी परिसरातील भैया कदम, युवराज सूर्यवंशी, संजय भोसले, अजित कदम, प्रकाश दरवान, गणेश अडकते, चेतन दरवान, भिकशेठ रोकडे, हरी भोसले, गणेश चव्हाण, अनिल माने, दीपक संकपाळ आदींनी परिश्रम घेतले. ‘लोकमत’ने या सदराखाली गत महिन्यापासून रस्त्यांच्या खड्डे व दुरवस्थेसंदर्भात सुरू केली. रंकाळा टॉवर ते नागोजीराव पाटणकर हायस्कूल या नवीन रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’ने ‘खड्ड्यात गेलंय कोल्हापूर माझं’ या वृत्तमालिकेद्वारे २९ आॅक्टोबरला ‘रस्ता दाखवा; बक्षीस मिळवा’या शीर्षकाखाली या रस्त्याची किती दुरवस्था झाली आहे ते सचित्र मांडले होते. त्यामुळेच रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली याबद्दल नागरिकांतून ‘लोकमत’चे कौतुक होत होते.
४५ लाखांची तरतूद...
रंकाळा बसस्थानक (श्री लस्सी सेंटर)पासून ते रंकाळा टॉवरपर्यंतच्या रस्त्यासाठी महापालिकेने ४५ लाखांची तरतूद केली आहे. हा रस्ता चार प्रभागात विभागला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात रंकाळा बसस्थानक ते पाटणकर हायस्कूलचा रस्ता होणार आहे.
पंधरा वर्षांनंतर रस्त्याला डांबर लागत आहे. त्यामुळे विशेष आनंद होत आहे. प्रचंड धुळीच्या साम्राज्याला तोंड देताना नागरिकांनी प्रचंड शोषिकता दाखवली. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेचे व आंदोलनाचे यश आहे.
- भैया कदम, नागरिक.