कला, वाणिज्यसाठी पुन्हा रांगा
By Admin | Updated: July 10, 2014 00:52 IST2014-07-10T00:50:38+5:302014-07-10T00:52:12+5:30
अकरावी प्रवेश आजपासून : विज्ञानचे मेरिटसह अर्ज घटले; १६ पासून कॉलेज सुरू

कला, वाणिज्यसाठी पुन्हा रांगा
कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अंतिम निवड यादी समितीने आज, बुधवारी आॅनलाईन जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विज्ञान शाखेचे मेरीट (गुणवत्ता) एक टक्क्यांनी घटली आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी यंदा अर्ज वाढले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाखेनुसार प्रवेश दिला आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवला जाणार नाही. उद्या, गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक शरद गोसावी व प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. बी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
गोसावी म्हणाले, शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दि. २७ जूनपासून सुरुवात झाली. समितीकडे १३ हजार २४४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १२ हजार ८०४ विद्यार्थ्यांची निवड यादी बनविली आहे. २० टक्के जागांवर व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयांनी प्रवेश दिले आहेत. निवड यादीसाठी प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या व क्षमता यांचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आरक्षणदेखील लक्षात घेतले आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी ६७४६, वाणिज्य शाखा (मराठी) २७५८, (इंग्रजी) ११५८, तर कला शाखा (मराठी) २१२०, (इंग्रजी) २२ अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे.
यावर्षी विज्ञान शाखेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० अर्र्ज कमी, तर वाणिज्यसाठी ६५०, कलासाठी ३८३ अर्ज अधिक आले आहेत. त्यावर तुकड्या न वाढविता सध्याच्या कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढवून दिल्या आहेत. त्यात केवळ वाणिज्य शाखांच्या मराठी माध्यमची तुकडीची प्रवेश क्षमता ८० वरून ११०, तर इंग्रजी माध्यमची १३० वरून १६० इतकी केली आहे. तर, कला, विज्ञानच्या तुकडीत कोणताही बदल केलेला नाही. निवड यादी पाहिली असता गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचे मेरिट एक टक्क्याने घसरले आहे.
डॉ. पाटील म्हणाले, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी उद्यापासून या कालावधीत कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बदल करता येणार नाही. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये दि. १६ जुलैपासून सुरू होतील. (प्रतिनिधी)