‘रॅमकी’ कर्मचाऱ्यांचा मनपाच्या दारात ठिय्या
By Admin | Updated: December 9, 2014 00:32 IST2014-12-09T00:08:28+5:302014-12-09T00:32:43+5:30
किमानवेतनाची मागणी : आश्वासनानंतर माघार

‘रॅमकी’ कर्मचाऱ्यांचा मनपाच्या दारात ठिय्या
कोल्हापूर : ‘रॅमकी इन्व्हायरो इंडिया लिमिटेड’कडे २००७ ते २०११ या क ालावधीत शहरातील कचरा उठावासाठी कमी मानधनावर राबणाऱ्या सफाई कामगारांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनातील फरकाचे ३ कोटी ७ लाख रुपये देण्याचे साहाय्यक कामगार आयुक्त सुहास कदम यांनी २ सप्टेंबर २०१४ला आदेश दिले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने हक्काचे पैसे द्या, या मागणीसाठी आज, सोमवारी ‘रॅमकी’च्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात ठिय्या आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी किमानवेतनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
‘रॅमकी’ने कचरा उठाव करणाऱ्यांना द्यावयाच्या फरकाबाबत रक्कम ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने साहाय्यक कामगार आयुक्तांना दिले होते. महापालिकेतर्फे शहरातील कचरा उठावचा ठेका घेतलेल्या ‘रॅमकी’ने सफाई कर्मचाऱ्यांना अठराशे रुपयांच्या ठोक मानधनावर कामावर घेतले होते. यावेळी ‘रॅमकी’ने किमानवेतन कायद्याचा भंग केल्याची तक्रार मुंबईतील महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने उच्च न्यायालयात केली होती.
न्यायालयाने किमानवेतन अधिनियमन १९४८ कलम (२०) नुसार किमानवेतन देण्याचे आदेश दिले. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून साहाय्यक कामगार आयुक्तांना किमानवेतनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या.
याप्रकरणी गेली चार महिने सुहास कदम यांच्याकडे सुनावणी सुरू झाली. ‘रॅमकी’ची महापालिकडे किमान सव्वा कोटी रुपयांची अनामत रक्कम व दीड कोटी रुपयांची वाहने पडून आहेत. ही वाहने व अनामत रक्कम परत द्या किंवा यातून कामगारांचे पैसे भागवा, असा आदेश दिला. मात्र, याबाबत महापालिकेने अद्याप कार्यवाही केली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)