दिमाखाने कोसळणारा रामतीर्थ धबधबा पाण्याअभावी बंद
By Admin | Updated: May 15, 2015 00:06 IST2015-05-14T21:43:55+5:302015-05-15T00:06:00+5:30
पर्यटकांची निराशा : सोहाळे बंधाऱ्यात पाणी न अडविल्याचा परिणाम, लोकवर्गणीच्या वादात बरगेच घातले नाहीत

दिमाखाने कोसळणारा रामतीर्थ धबधबा पाण्याअभावी बंद
ज्योतीप्रसाद सावंत -आजरा येथील वर्षभर मोठ्या दिमाखाने कोसळणारा रामतीर्थ धबधबा पाण्याअभावी बंद झाला आहे. सोहाळे बंधाऱ्यात पाणी न अडविल्याने रामतीर्थ धबधब्यात पाणीच नाही. यामुळे पर्यटकांची घोर निराशा होत आहे.रामतीर्थ धबधबा हा पर्यटकांचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. वर्षभर पर्यटक रामतीर्थला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असतात. सोहाळे बंधाऱ्यात अडविले जाणारे पाणी एप्रिल, मे दरम्यान होणारा जोरदार वळवाचा पाऊस यामुळे मेअखेरपर्यंत रामतीर्थचा धबधबा कोसळत असतो.यावर्षी मात्र लोकवर्गणीच्या वादात सोहाळे बंधाऱ्यात बरगेच न घातल्याने पाणी अडविले गेलेले
नाही. सोहाळे येथे पाणी न अडविल्याने साळगाव व देवर्डे बंधाऱ्यांमध्येही पाणी साठलेले नाही. परिणामी, हिरण्यकेशीचे पाणी वाहणे बंद झाले असून, नदीपात्रात ठिकठिकाणी डबक्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे रामतीर्थ धबधब्यापर्यंत पाणीच येऊ शकत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘रामतीर्थ’ धबधबा कोसळणे बंद झाले आहे. बहुतांशी पर्यटकांना याची कल्पना नाही. मात्र, पर्यटकांच्या गाड्या उन्हाळी सुट्यांमुळे रामतीर्थकडे वळत आहेत. पण पर्यटकांची धबधब्याऐवजी निराशा होत आहे. परंतु, रामतीर्थ येथील नदीपात्रातील पाण्याअभावी उघडे पडलेले महाकाय कातळ, नदीपात्रात टाकलेल्या अस्थी, राख, मातीची मडकी, केस याचेच दर्शन घ्यावे लागत आहे. प्यायलाही चांगले पाणी नाही. शीतपेय, चहा यांचीही व्यवस्था नाही. असाच काहीसा प्रकार असल्याने पर्यटकांची घोर निराशा होत आहे.
रस्ता के व्हा होणार?
तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा कांगावा करणारी व तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींना रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा दिसत नाही का? असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहून भाविक व पर्यटक करीत आहेत.