अवेळी पाणीपुरवठ्याने ‘रमणमळा’ हैराण
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:13:00+5:302015-03-09T23:44:31+5:30
जलतरण तलाव बंद : नव्याने विकसित होणाऱ्या कॉलन्यांमध्ये निधीअभावी विकासकामांवर मर्यादा

अवेळी पाणीपुरवठ्याने ‘रमणमळा’ हैराण
रमणमळा प्रभागात न्यू पॅलेस, कसबेकर पार्क, बेडेकर मळा, नाईक मळा, उदयसिंह नगर, छत्रपती पार्क, महावीर कॉलेज, आदी परिसरासह १६ लहान-मोठ्या नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांसह शेतीचा काही भाग येतो. प्रभागात रस्ते, गटारी, रस्त्यावरील दिवे यांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. परंतु, प्रभागात पहाटे ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त आहेत. त्याचप्रमाणे जलतरण तलावही अनेक महिने बंद अवस्थेत आहे. प्रभागात नगरसेवकांचा संपर्क चांगला आहे. प्रभागाचा विस्तार महावीर कॉलेजपासून ते बावड्यातील शाहू जन्मस्थळापर्यंत असा विस्तीर्ण आहे. न्यू पॅलेस परिसरात विकसित झालेल्या नवीन कॉलन्या आणि शिंदे मळा, पोवार मळा, नाईक मळा, आदी ठिकाणी शेतात प्लॉट पाडून विकसित झालेल्या कॉलन्यांमुळे रस्ते व गटारी करण्यात निधीअभावी मर्यादा आल्या आहेत. तरीही शक्य तिथले रस्ते करण्याचा नगरसेवकांनी प्रयत्न केला आहे. प्रभागात उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांचा समावेश आहे.
प्रभागात मुख्य समस्या आहे ती अवेळी येणाऱ्या पाण्याची. पहाटे ३ ते ६ या वेळेत पाणी येते. पाण्याची ही वेळ बदलून मिळावी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी प्रभागात रास्ता रोकोही झाला. नगरसेवकांकडे लेखी तक्रार केली, महापालिकेला कळवले. परंतु, पाण्याच्या वेळेत बदल झालेला नाही. नगरसेवकांनीही पाण्याची वेळ बदलून मिळावी, तसेच जास्त दाबाने पाणी सोडावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु, काही फरक पडलेला नाही. संतप्त नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना वारंवार तोंड द्यावे लागते. पाण्याची वेळ बदलून मिळण्यासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
प्रभागात महापालिकेचा जलतरण तलाव आहे. या तलावामुळे परिसरातील लोकांना सुविधा होत होती. परंतु, दुरवस्था झाल्याने गेली काही महिने हा तलाव बंद आहे. सध्या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अजून काही दिवस तलाव बंद राहणार आहे. प्रभागात नगरोत्थानमधून महावीर कॉलेज ते न्यू पॅलेस सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, रेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळ या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही.
सध्या प्रभागात ‘छत्रपती पार्क’ गार्डनचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होणार आहे. गार्डनचे काम पूर्ण झाल्यानंतर गार्डनच्या शेजारील जागा विकसित करण्यात येणार आहे. त्याचेही काही ठिकाणी काम सुरू आहे.
प्रभागात आतापर्यंत तीन कोटी ७५ लाख रुपयांची विकासकामे केली. त्यासाठी मालोजीराजे छत्रपती आणि महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. यामध्ये प्रामुख्याने भागातील रस्ते, गटारी केल्या. तसेच छत्रपती पार्क गार्डनसाठी ४० लाख रुपये, तर जलतरण तलावासाठी ११ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले. जलतरण तलावासाठी अद्याप १० लाख रुपये खर्च करावयाचा आहे.
- राजाराम गणपती गायकवाड, नगरसेवक