रामलिंग लेणीस्थळाची शासनाकडून अवहेलना
By Admin | Updated: September 2, 2014 00:02 IST2014-09-01T21:30:14+5:302014-09-02T00:02:17+5:30
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे : शासनाने लक्ष घालणे गरजेचे

रामलिंग लेणीस्थळाची शासनाकडून अवहेलना
राम करले -- बाजारभोगाव --पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग लेणी पर्यटकांबरोबर आध्यात्मिक लोकांनाही आकर्षित करत आहेत. त्यामुळे शासनाने पर्यटनदृष्ट्या तेथे विकास साधण्याची गरज आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे या चांगल्या पर्यटनस्थळाची अवहेलना झाली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा या मुख्य रस्त्याला असळज गावानजीक पळसंबे फाटा आहे. फाट्यापासून लेण्यापर्यंत ३ किलोमीटरचा रस्ता आहे. जिथे रस्ता संपतो, तिथे एक आश्रम पाहायला मिळते. २०० फूट अंतरावर गेल्यावर दोन डोंगरांच्या मध्यभागी तयार झालेल्या खोलगट भागामध्ये दाजीपूर अभयारण्यातून घनदाट जंगलातून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा ओढा लागतो. येथेच पळसंब्याची रामलिंग म्हणून ओळखली जाणारी लेणी पाहायला मिळतात. ओढ्यातील पाच लेणी पाहून आपण आश्चर्यचकीत होतो. अखंड दगडामध्ये घडविलेली ही मंदिरे रम्यस्थळी व अफलातून आहेत.
अखंड पाषाणाच्या दगडामध्ये घडीव तीन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिराला एक प्रवेशद्वार आहे. मंदिराचा आकार गोल असून, १० फुटाच्या परिघात अखंड पाषाणावर कोरीव काम केलेले आढळते. दुसऱ्या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. १० फुटाच्या परिघात २० फूट पायापासून ते मनोऱ्यापर्यंत अखंड पाषाणात पश्चिमेकडे मुख्य द्वाराचे तोंड आहे. त्याच्या वरील बाजूला तिसरे मंदिर सर्वांत मोठे आहे. मात्र, तेथे एक गुप्त खोली व बाहेर एक अशी दोन खोल्यांची मंदिरे आहेत. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला एक गुहा आढळते. मोठ्या अखंड दगडामध्ये समोरच कातळ दगडावर १२ जोतिर्लिंगाची कोरीव मूर्ती पाहावयास मिळते.