रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा

By Admin | Updated: July 8, 2016 01:01 IST2016-07-08T00:14:27+5:302016-07-08T01:01:09+5:30

जिल्ह्यात अपूर्व उत्साह : नमाज पठण, शुभेच्छांचा वर्षाव, शिरखुर्म्याचा आस्वाद; इचलकरंजीत विश्वशांतीसाठी प्रार्थना

Ramadan Eid Link to Social Unity | रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा

रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा

कोल्हापूर : नमाज पठण, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, शिरखुर्म्याचा आस्वाद आणि अधून-मधून पावसाच्या सरी झेलत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण गुरुवारी उत्साहात साजरा झाला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणात तसेच विविध मशिदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने सर्वच मशिदींच्या पटांगणावर सकाळी
नमाज पठण झाले. मुस्लिम बोर्डिंग येथे पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या जमातच्या नमाजासाठी हाफिज आकिब
म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. सर्वांनी कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुख-शांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली.
त्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, बसवराज शिवपुजे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, आर. के. पोवार, राजू लाटकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एपीआय सुशांत चव्हाण, पीएसआय युवराज पांढरे उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी स्वागत केले. अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आभार मानले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, हा. लियाकत मुजावर, साजिद खान, अमीर हमजेखान शिंदी, हा. जहाँगीर अत्तार, हाजी मुसा पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.
याशिवाय शहरातील बागल चौकातील कब्रस्तान मशीद, शनिवार पेठेतील गवंडी मस्जिद, कदमवाडी, मणेरमळा, आदिलशाह मस्जिद, अकबर मोहल्ला, मणेर मस्जिद, कब्रस्तान मस्जिद, विक्रमनगर
मस्जिद, वाय. पी. पोवारनगर, साकोली कॉर्नर, टाकाळा, जमादार कॉलनी, कसबा बावडा, रंकाळा मस्जिद, आदी मस्जिदींमध्ये नमाज पठण झाले.
इदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या कुटुंबांतही पाहुण्यांचा राबता होता. पुरुष मंडळी, महाविद्यालयीन मुलांचा मित्रपरिवार यांच्यासह कार्यालयीन सहकाऱ्यांना शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कुटुंबातील महिला आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात गुंतल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत शहरात उत्साहाचे वातावरण
होते.


सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सोशल मीडियावरही रमजान ईद साजरी करण्यात आली. धर्म-जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची... एकमेकांच्या गाठीभेटी
घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची... अशा शुभेच्छा संदेश दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होते. विशेषत: चंद्र आणि लहान मुलांचे गळाभेट घेत असलेले छायाचित्र पसंतीस उतरत होते.

Web Title: Ramadan Eid Link to Social Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.