भुदरगडमध्ये आपुलकीने साजरा होतो रमजान

By Admin | Updated: July 7, 2015 23:51 IST2015-07-07T23:51:02+5:302015-07-07T23:51:02+5:30

तालुक्यात १४ गावांत मस्जिदी : धार्मिक विधींनी मंगलमय वातावरण --महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

Ramadan celebrates in Bhadargad with affection | भुदरगडमध्ये आपुलकीने साजरा होतो रमजान

भुदरगडमध्ये आपुलकीने साजरा होतो रमजान

शिवाजी सावंत-गारगोटी -भुदरगड तालुक्यात अत्यल्प असणारा मुस्लिम समाज रमजानच्या पवित्र महिन्यात मात्र सर्वव्यापी असल्याचे भासते. दानधर्म, पाचवेळा नमाज पठण, रोजा, तरावीह पठण यांसारख्या धार्मिक विधींनी वातावरण मंगलमय झाल्याचे पाहावयास मिळते.
भुदरगड तालुक्यात १४ गावांमध्ये मस्जिदी आहेत. तर एकवीस गावांमध्ये मुस्लिम समाज आहे. अनफ खुर्द अनफ बुद्रुक अनफवाडी या गावांमध्ये १०० टक्के धर्मीय मुस्लिम राहतात. शिवाय या गावातील पुरुष मंडळी पोटापाण्यासाठी सौदी अरेबिया, दुबई या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने राहतात. करार संपेपर्यंत ही मंडळी गावाकडे येत नाहीत. त्यामुळे गावाकडे असणारी मंडळी या महिन्यातील हा सण साजरा करतात. काही गावांमध्ये इतर धर्मीयांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. सर्व धर्मीय हा सण गुण्यागोविंदाने साजरा करतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलेदेखील हा उपवास करतात. चिमुकल्यांची धार्मिकवृत्ती मोठ्यांनाही अचंबित करण्यासारखी आहे. तालुक्यातील २१ गावांमध्ये सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. इतक्या अल्प प्रमाणात हा समाज असतानादेखील धार्मिकविधी मिळून मिसळून साजरे करतात.
संध्याकाळचा रोजा इफ्तार मस्जिद साजरा करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. न जमल्यास घरीच रोजा इफ्तार केला जातो. इफ्तारनंतर मगरीब नमाज पठण होते. रात्री नऊनंतर तरावीह नमाज पठण होते.
सध्या तालुक्यात गारगोटी, शेणगाव, कडगांव, तिरवडे, अनफ खुर्द, अनफ बुद्रुक, अनफवाडी फकीर आवार, पाटगांव, वेसर्डे, भुदरगड, बारवे, मडूर, वेंगरूळ या ठिकाणी मस्जिदी आहेत. येथे दिवसातून पाच वेळा नमाज पठण तसेच तरावीहचे पठण होते. या व्यतिरिक्त वाघापूर, कूर, पिंपळगाव, वांगरगाव, दिंडेवाडी, दासेवाडी या गावांमध्ये मस्जिदी नाहीत; पण तुरळक प्रमाणात समाज आहे. गारगोटी येथील मस्जिदीत हाफीज सिद्घिक शेख हे इमामसाब म्हणून काम पाहतात, तर बाबाजान देसाई हे जिम्मेदार म्हणून काम करीत आहेत.
कडगाव येथे जुम्मा मस्जिद असून, येथे सुन्नत मुस्लिम जमात कार्यरत आहे. नमाज पठणासह रोजा इफ्तारसाठी मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधव आवर्जून उपस्थित राहतात. मस्जिदीचे जिम्मेदार सदस्य म्हणून दिलावर अबू काझी, यासीन नुरुद्दीन काझी, महमंद इब्राहीम काझी, वजीर गफूर मकानदार, आदी कार्यरत आहेत.
अनफ खुर्द व अनफ बुद्रुक या दोन्ही गावांत सर्वच समाज हा मुस्लिम आहे. इथली लहान मुले ही मराठी, उर्दू आणि हिंदी या तिन्ही भाषा बोलू शकतात, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी इंग्रजी ही चौथी भाषा सुद्धा अवगत केली आहे. शिवाय या धर्मातील मुली शिक्षण घेत आहेत. एक आगळावेगळा असा पे्रमाचा भाईचारा येथे रुजला आहे. जितक्या आनंदाने इतर धर्मीयांचे सण साजरे होतात.

दिवसभर रोजा असताना देखील प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी भुकेचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखविता आनंदाने बागडत असतात. संपूर्ण दिवसभरात पाण्याचा एक थेंब देखील तोंडात न घेता केलेला उपवास हा त्यांचे धर्माविषयीचे प्रेम व दृढनिश्चयता दर्शवितो.
अनफ येथील सर्व विद्यार्थ्यांना त्याच गावातील मदरसामधून धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. हे सर्व विद्यार्थी सकाळी व संध्याकाळी न चुकता अरबी भाषेतील ‘कुरआन’चे शिक्षण घेतात.

Web Title: Ramadan celebrates in Bhadargad with affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.