राम-रहीम जोडीने जपलीय परंपरा
By Admin | Updated: July 31, 2014 23:21 IST2014-07-31T22:39:09+5:302014-07-31T23:21:18+5:30
नेसरीत ३५ वर्षांच्या अखंड सेवा : लाह्या काढण्याचा व्यवसाय

राम-रहीम जोडीने जपलीय परंपरा
रवींद्र हिडदुगी - नेसरी ,, संगणकीय व यांत्रिक युगात ग्रामीण भागातील व्यवसायांवर दिवसेंदिवस कुऱ्हाड कोसळत असल्याचे चित्र आपण पाहतोय. प्लास्टिक आणि सिमेंट वस्तूंच्या संस्कृतीमुळे अनेक कारागिरांच्या हातांची कला ‘स्लो मोशन’ होत आहेत. पारंपरिक सुतार, लोहार, कुंभार, पेंटर यांच्या कलाकुसरींच्या वस्तू ‘रेडिमेड’च्या स्वरूपात मिळत असल्याने त्यांना अन्यत्र रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही नेसरीतील राम-रहीमच्या जोडीने लाह्या काढण्याची परंपरा अनेक वर्षे जपली आहे. अर्थात राम (शिवाजी कांबळे) व रहीम (रजाक मुजावर) यांनी आपली ३५ वर्षांची दोस्ती कायम टिकवत नागपंचमीच्या सणानिमित्त दरवर्षी लाह्या काढण्याची परंपरा जपून ग्रामीण जनतेला ‘रेडिमेड’ पदार्थापासून वाचविले आहे. कारण नागपंचमीच्या सणाला ज्वारीच्या लाह्यांना महत्त्व दिले जाते. दरवर्षी अशा ज्वारीच्या लाह्या तयार करण्यासाठी नेसरी येथे शिवाजी कांबळे व रजाक मुजावर नेसरी बसस्थानक शेजारी आपला व्यवसाय थाटतात. जमिनीत चार फुटांचा खड्डा खणून त्यामध्ये चुल्हाने तयार केले होते व त्यावर लोखंडी मोठी कढई ठेवली जाते. कढईमध्ये समुद्रातील वाळू तापवून त्यात ज्वारी टाकून त्याला चार-पाचवेळा परतल्यानंतर त्याच्या लाह्या तयार होतात. अशा लाह्या तयार होत असतानाचा आनंद मोठा असतो. आता ज्वारीच्या लाह्याबरोबरच लोक मक्क्याच्या लाह्या व हरभरे-वाटाणेही भाजून घेऊन जातात.याबाबत कांबळे व मुजावर म्हणाले, आम्ही दोघे पूर्वी म्हमूलाल नूलकर यांच्या भट्टीमध्ये कामाला होतो; मात्र यांत्रिक युगात ही भट्टी बंद पडली व आमचा रोजगार थांबला. आम्ही आता शेतीच्या कामाबरोबर पडेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत; मात्र नूलकर मालकांच्या भट्टीतील कला आत्मसात असल्याने आम्ही दोघांनी दरवर्षी नागपंचमीच्या सणाला लाह्या काढून देण्याचा निर्णय घेतला. ही कला आम्हाला आनंद मिळवून देण्याबरोबरच चार पैसे मिळवून देते, असे सांगून नेसरीसह आजूबाजूच्या २०-२५ खेड्यांतील ग्रामीण जनता येथे लाह्या काढून नेत असल्याचे सांगितले.
शिवाजी कांबळे व रजाक मुजावर या राम-रहीम जोडीने हा व्यवसाय अर्थात कला जिवंत ठेवल्याने नेसरी व परिसरात यांची दरवर्षी घरोघरी चर्चा होते, हे मात्र नक्की.