‘वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशन’तर्फे रॅली
By Admin | Updated: July 24, 2016 00:35 IST2016-07-24T00:29:28+5:302016-07-24T00:35:34+5:30
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : दोन तास भारतीय सैनिकांसाठी

‘वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशन’तर्फे रॅली
कोल्हापूर : ‘भारत माता की जय..’, ‘वंदे मातरम्..’, इट का जवाब गोली से’ अशा घोषणांचा गजर करीत शनिवारी वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काश्मीरमध्ये चिघळलेल्या परिस्थितीवर आपल्या प्राणाची आहुती देऊन लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.
भारतमातेची प्रतिकृती असलेला रथ, त्यावर भारतीय जवानांची प्रतिमा, राष्ट्रध्वज घेतलेले युवक, सोबत देशभक्तीपर गीतांच्या उत्स्फूर्त निनादात रॅली काढण्यात आली. देशप्रेमींच्या घोषणा व रथावरील गीतांनी वातावरणात चैतन्य पसरले. प्रायव्हेट हायस्कूल येथून सुरू झालेली रॅली मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा ते बिंदू चौक या मार्गावरून काढण्यात आली.
रॅलीत शाळा महाविद्यालयातील युवक व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सोशल मीडियावरून वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनने केलेल्या ‘दोन तास भारतीय सैनिकांसाठी’ या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला.
रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, बंडा साळोखे, अवधूत भाट्ये, कमलाकर किलकिले, फत्तेसिंह सावंत, महेश उरसाल, अशोक रामचंदानी, सुधीर जोशी, विराज ओतारी, हर्षल सुर्वे, सुदीप चव्हाण, सुनील पाटील, आकाश नवरूखे, प्रसाद मोहिते यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनतर्फे शनिवारी काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.