मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: February 13, 2015 22:53 IST2015-02-13T22:52:02+5:302015-02-13T22:53:59+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आरक्षण पूर्ववत करा; राज्य सरकाने भूमिका स्पष्ट करावी

मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी; तसेच समाजाला देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन देण्यात आले.
दसरा चौक येथून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरू झालेल्या मोर्चात आजरा, गडहिंग्लज, कागल, शिरोळ, करवीर तसेच कोल्हापूर शहरातील मुस्लिम मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांना मार्चेकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती, मेहमूद्दूर रहेमान समितीच्या अहवालाने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणावर प्रकाश टाकून मुस्लिम समाजाला आरक्षण देणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. हा समाज आर्थिक व विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक व सरकारी नोकरीत आरक्षण मिळणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती पाहून मागील सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले. मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवले, असे असतानाही राज्य सरकारने आरक्षण रद्द करून मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे.
आजच्या मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष
अस्लम मुल्ला, आरीफ मुजावर, नईम चौगुले, मुबारक बागवान, गणी आजरेकर, नुश्रीफ बुजरूग,
इस्माईल ऐनापुरे, दिगंबर सकट,
संतोष कांबळे, मुफ्तिफिरोज इनामी, मोहसीन शेख, मेहबूब बागवान, संभाजी कागलकर, मेहबूब बोजगर, फरीद मुजावर, आदींनी केले.