कोल्हापूर: राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. या कथीत आरोपाला उत्तर देत ही ५०० एकर जमीन क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीसपत्र करण्यासाठी राजू शेट्टींसह कार्यकर्ते भर पावसात २ तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले होते. मात्र, क्षीरसागर न आल्याने कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्या बक्षिसपत्रावर सह्या करून सदरचे बक्षीसपत्र रात्री- अपरात्री कधीही येवून घेवून जाण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त ५०० एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार असल्याचे जाहीर केले होते. आज, शनिवारी शेट्टींनी वकीलासह बिंदू चौकात उपस्थित राहून बक्षिसपत्राचे कार्यकर्त्यांच्या साक्षीने वाचन करून त्यावर सह्या केल्या. यावेळी शेट्टी म्हणाले, मी आजपर्यंत पाच निवडणुका जनतेच्या लोकवर्गणीतून लढविल्या. मला राज्यभर फिरण्यासाठी दिलेली फॅार्च्युनर गाडीसुध्दा लोकवर्गणीतून देण्यात आलेली आहे. मला गाडी घेण्यासाठी आयआरबीच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करावे लागले नाही, मी कोणत्या डॉक्टराकंडून, बिल्डराकडून, उद्योजकाकडून बगलबच्चांना पाठवून हप्ते गोळा केले नाहीत. महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमीनी बळकावल्या नाहीत. त्यामुळे क्षीरसागरांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी असे आव्हान दिले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी व राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणा देवून बिंदू चौक दणाणून सोडला. स्वाभिमानीचे आंदोलन असल्याने पोलिस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे रविकिरण इंगवले, कॅाम्रेड सम्राट मोरे, सुनिल मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी व शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kolhapur: क्षीरसागरांनी आरोप केला, ५०० एकराचे बक्षीसपत्र घेवून राजू शेट्टींनी पावसात ठिय्या मारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:29 IST