राजू शेट्टींनी फिरविला आंदोलनाचा चाबूक

By Admin | Updated: October 16, 2015 22:18 IST2015-10-16T22:07:45+5:302015-10-16T22:18:58+5:30

सरकारला इशारा : शेतकऱ्यांच्या बाजूने राहा; अन्यथा पुढचे वर्ष वाईट

Raju Shetty revolves around the whip | राजू शेट्टींनी फिरविला आंदोलनाचा चाबूक

राजू शेट्टींनी फिरविला आंदोलनाचा चाबूक

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती, याचे भान ठेवून फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे; अन्यथा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो, पुढील वर्ष सरकारसाठी वाईट जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’ने शुक्रवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढत साखर कारखानदारांसह सरकारला तंबी दिली.
खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी साखरेचे दर पडल्याने दया दाखवली; पण यावर्षी २८०० रुपये दर आहे. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार असल्याने तीन हजारांच्या वर साखरेचे दर जातील. त्यामुळे एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास अडचण येणार नाही. तरीही कारखानदारांनी रडीचा डाव केला, तर त्यांच्या छाताडावर बसून ‘एफआरपी’ वसूल केल्याशिवाय राहणार नाही. साखर कारखान्यांच्या सभेत टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचे बेकायदेशीर ठराव केले आहेत. हे ठराव त्यांना मागे घ्यावे लागणार आहेत. तसेच राज्यातील विभागीय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून इशारा देणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत सरकार काय करते ते बघूया. सरकार कारखानदारांच्या बाजूने राहिले तर सरकारविरोधात बंड करावे लागेल. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत , वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर, सतीश काकडे, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, या मागणीचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ६९ हजार २६८ शेतकऱ्यांचे अर्ज प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज जाचक, माजी आमदार नानासाहेब माने, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती सीमा पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, अनिल मादनाईक, जयकुमार कोल्हे, आदी उपस्थित होते.
मंत्री समितीत अजित
पवारांचे काय काम?
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक असते. त्यात सहकार, कृषी, अर्थमंत्र्यांसह संबंधित खात्याचे सचिव व आयुक्त असतात; पण यावर्षीच्या बैठकीला अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांना का बोलावले होते? याचे उत्तर सरकारने द्यावे, असे शेट्टी यांनी सांगितले.
बिगर शेतकरी मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या बाजूने
महाराष्ट्राच्या इतिहासात बिगर शेतकरी मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तर मनोहर जोशी यांनी झोन बंदी उठवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने राहतील, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
लाल दिव्यापेक्षा छातीवरचा
लाल बिल्ला महत्त्वाचा
मंत्रिपदासाठी आम्ही कधीच तडजोड करणार नाही. लाल दिव्यापेक्षा छातीवरचा लाल बिल्ला महत्त्वाचा असून, त्यामुळेच महाराष्ट्रात माझी ओळख व किंमत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


‘स्वाभिमानी’ने आवळली मूठ..!
ऊसकरी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला व देवेंद्र फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर सरकार हलविल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील शेतकरी रखरखत्या उन्हातही हातात उसाचे कांडे घेऊनच मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Raju Shetty revolves around the whip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.