राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:21+5:302021-08-21T04:29:21+5:30
कोल्हापूर: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात योगदान देणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात ...

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले
कोल्हापूर: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात योगदान देणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी शुक्रवारपासून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इन्फ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप आणि स्पेशल अवाॅर्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा ५ विभागांत या पुरस्कारांची निवड होणार आहे. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावर्षीचे पुरस्कारांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. २० ऑगस्ट २०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असून १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. २७ सप्टेंबर २०२१ रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल. ३० सप्टेंबर २०२१ रोजी छाननी समितीची प्राथमिक बैठक होईल, तर २० ऑक्टोबर २०२१ छाननी समितीची अंतिम बैठक होईल.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर हा आधुनिकीकरणाचा केंद्रबिंदू आहे. स्व. राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व राष्ट्रीय विकासातील त्याचा परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळेच दरवर्षी दि. २० ऑगस्ट हा माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून राज्य सरकारकडून साजरा करण्यात येतो. आता त्याच्या पुढे पाऊल टाकत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून म्हणून हे पुरस्कार दिले जाणार आहेत.