दोन्ही हात नसताना तो झाला सॉफ्टवेअर इंजिनिअर हेल्पर्सच्या राजेश पिल्लेची यशोगाथा : नामांकित कंपनीत लागली नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:07+5:302021-08-21T04:28:07+5:30
कोल्हापूर : राजेश पिल्ले. जन्मतःच दोन्ही हात नसलेला, आईवडील किंवा नातेवाईक नसलेला एक कर्तबगार तरुण. ...

दोन्ही हात नसताना तो झाला सॉफ्टवेअर इंजिनिअर हेल्पर्सच्या राजेश पिल्लेची यशोगाथा : नामांकित कंपनीत लागली नोकरी
कोल्हापूर : राजेश पिल्ले. जन्मतःच दोन्ही हात नसलेला, आईवडील किंवा नातेवाईक नसलेला एक कर्तबगार तरुण. आपल्या पायाने लिहित मोठ्या कष्टाने त्याने यावर्षी इंजिनीयरिंगची पदवी मिळवली व सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून तो एका नामांकित कंपनीत काम करत आहे. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड संस्थेचे तो एक भूषण ठरला आहे. शारीरिकदृष्ट्या धडधाकट मुले विविध कारणे सांगून आयुष्याबद्दल सतत तक्रारी करत असताना राजेशची धडपड कुणालाही प्रेरणादायी आहे.
राजेश १३ वर्षांपूर्वी हेल्पर्समध्ये दाखल झाला तो मुंबईच्या एका अनाथाश्रमामार्फत. १४-१५वर्षांचा, जन्मत:च दोन्ही हात नसलेला, आईवडील किंवा अन्य कोणी नातेवाईक यांचा पत्ता नसलेला. पण राजेशचे भिन्नक्षम असणे किंवा निराधार असणे ही या संस्थेच्या दृष्टीने मोठी समस्या नव्हती. त्याच्या वर्तनाविषयी अनेक तक्रारी होत्या. पण हळूहळू घरौंदा या संस्थेच्या वसतिगृहातील आणि समर्थ विद्यालयातील प्रेमळ आणि शिस्तबद्ध अशा डोळस संगोपनाचा विशेषतः पी.डी. देशपांडे यांनी दाखवलेल्या विश्वासाचा त्याच्यावर चांगला परिणाम झाला. त्याचे व्यक्तिमत्त्व बदलू लागले. संस्थेच्या समर्थ विद्यालयातून तो दहावी झाल्यावर महावीर कॉलेजला त्याने अकरावीला प्रवेश घेतला खरा, पण यश काही त्याला साथ देईना. भाषिक कौशल्यापेक्षा वेगळी तांत्रिक कौशल्ये त्याच्याकडे असल्याचे संस्थेच्या लक्षात आले. म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आयटी डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. संस्थेतून जाणे येणे कठीण होऊ लागले म्हणून संस्थेनेच त्याची अन्यत्र राहण्याची सोय केली. दोन्ही हात नसल्यामुळे हाही अभ्यासक्रम त्याच्या दृष्टीने अडथळ्यांची शर्यतच ठरली. पण अपयश पचवत, निर्धाराने आणि नेटाने पुढे जात त्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा मिळवला. तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन पुढे कराडच्या सरकारी कॉलेजमध्ये त्याने प्रवेश मिळवला. सर्व अडचणींवर मात करून या दोन्ही हात नसलेल्या, पायानेच लिहू शकणाऱ्या तरुणाने बीईची पदवी मिळवली आणि आता तो एका कंपनीत ज्युनिअर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी निभावत आहे.
संगणकाची गरज
हेल्पर्स संस्थेतील मुलांसाठी सध्या संगणकाची गरज आहे. या संस्थेला मदत म्हणजे सत्पात्री दान असाच संस्थेचा आजपर्यंतचा व्यवहार राहिला आहे. दानशूर व्यक्तींनी संगणकासह अन्य मदत करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.