राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करा
By Admin | Updated: December 4, 2014 00:56 IST2014-12-04T00:56:43+5:302014-12-04T00:56:43+5:30
सत्यजित कदम यांची याचिका : निवडणूक प्रतिज्ञापत्रात १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप

राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करा
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व त्यांचा तपशील याची पूर्ण माहिती दिलेली नाही. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यांमध्ये मोठी तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार व नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे (याचिका क्रमांक २३/२०१४) केली.
कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. याबाबत क्षीरसागर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, उद्या, गुरुवारी सविस्तर स्पष्टीकरण करू, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान क्षीरसागर यांनी २० सप्टेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगास दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन वर्षे किंवा अधिक कालावधीच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध किंवा दोषारोप नसल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाचे नाव असलेले किंवा दखल घेतलेले २० गुन्हे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद आहेत; तर विविध आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको, आदी स्वरूपांचे इतर आणखी २० गुन्हे पोलिसांत नोंद असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे क्षीरसागर यांनी दिली आहे.
मात्र, याव्यतिरिक्त क्षीरसागर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०१३, १५/२००४) लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे (४२/२००६, १०/२००९, १२४/२०१०, ९४/२०११, १५१/२०११, ३६/२०१२, १०/२००३, २/ २०१४), शाहूपुरी पोलीस ठाण्यात (१२/२००४, ९६/२०१३, १२०/२०१३, १०३/२०१२, ३६१/२००८) आदी १५ गुन्ह्णांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे कदम यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. क्षीरसागर यांनी गुन्ह्णाची अपुरी माहिती दिल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी न्यायालयाकडे केली आहे.
पक्षांतर्गत विरोधकांना आयते कोलीत
राजेश क्षीरसागर व सत्यजित कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. निवडणुकीनंतर दोघांत शहरातील रस्त्यांच्या उद्घाटन समारंभावरून संघर्ष सुरू झाला. यामध्ये महापालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करीत राजशिष्टाचाराप्रमाणेच रस्त्यांची उद्घाटने होतील, असे स्पष्टीकरण केले; परंतु हा वाद तेथेच न थांबता आता उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. गेले दोन दिवस क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली. कदम यांच्या याचिकेमुळे क्षीरसागर यांच्या मंत्रिमंडळातील सहभागास अडचणी निर्माण होऊ शकतात. याचिकेमुळे पक्षांतर्गत विरोधकांनाही आयते भांडवल मिळणार आहे.(प्रतिनिधी)