राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद!

By Admin | Updated: December 3, 2014 00:40 IST2014-12-03T00:40:22+5:302014-12-03T00:40:22+5:30

शिवसेनेतून संधी : अधिकृत घोषणा उद्यापर्यंत : फटाक्यांची आतषबाजी

Rajesh Kshirsagar is minister! | राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद!

राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद!

कोल्हापूर : ‘शिवसेनेचे लढाऊ आमदार’ अशी प्रतिमा असलेल्या राजेश क्षीरसागर यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे आज, मंगळवारी स्पष्ट झाले. त्यांचे राज्यमंत्रिपद निश्चित झाले असून त्याची अधिकृत घोषणा दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. स्वत: क्षीरसागर यांनीही त्यास दुजोरा दिला.
वृत्तवाहिन्यांवर त्यासंबंधीच्या बातम्या दिवसभर सुरू राहिल्याने शहरात क्षीरसागर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
भाजप व शिवसेना सत्तेसाठी एकत्र येणार की नाही, हीच गेल्या महिन्याभरातील संभ्रमावस्था होती. सत्तेसाठीची रस्सीखेच या दोन्ही पक्षांत सुरू राहिल्याने कार्यकर्त्यांतही कमालीची घालमेल सुरू होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्णांतील दहापैकी सहा जागा मिळाल्या. पक्षाला कोल्हापुरात हे घवघवीत यश मिळाल्याने स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गेले. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर एक राज्यमंत्रिपद कोल्हापूरला मिळणार हे नक्कीच होते. त्यासाठी आमदार क्षीरसागर व आमदार चंद्रदीप नरके यांच्यात रस्सीखेच सुरू होती. नरके यांनीही या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती परंतु क्षीरसागर हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने व त्यांनी कोल्हापूर शहरात दोन्हीवेळा दणदणीत / पान ४ वर


राज्यमंत्रिपदासाठी
नरके यांचीही फिल्डिंग
राज्यमंत्रिपदासाठी आमदार चंद्रदीप नरके यांचेही जोरदार प्रयत्न सुरू असून अजूनही त्यांनाच संधी मिळेल, असे त्यांच्या निकटवृत्तीयांकडून सांगण्यात आले.


आधी नगरविकास नंतर गृह..
क्षीरसागर यांच्या राज्यमंत्रिपदाची अद्याप अधिकृत घोषणा पक्ष अथवा सरकार या पातळीवर झालेली नाही. परंतु तरीही त्यांना नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाल्याची चर्चा दुपारनंतर सुरू राहिली. दुपारनंतर त्यांना गृहराज्यमंत्रिपद मिळाल्याची हवा होती. सोशल मीडियावरही तसेच मेसेज फिरत होते. त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार या वृत्ताने शिवसेनेतील क्षीरसागर गटात कमालीचा उत्साह होता.

विजय मिळविल्याने त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता ठळक झाली आहे.
दुपारी सत्तेत शिवसेना सहभागी होणार हे निश्चित झाल्यावर क्षीरसागर यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर व शनिवार पेठ परिसरात जोरदार आतषबाजी केली. आमदार यांच्या पत्नी वृषाली क्षीरसागर यांचाही आज वाढदिवस असल्याने त्याचेच फटाके असतील असे लोकांना सुरुवातीला वाटले परंतु नंतर आमदारांचे राज्यमंत्रिपद निश्चित झाल्याची वार्ता शहरभर पसरली. त्यांच्या राज्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे निधन झाल्याने
तीन दिवसांचा दुखवटा आहे.
त्यामुळे त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा व शपथविधीची तारीख जाहीर होईल, असे
सूत्रांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)

Web Title: Rajesh Kshirsagar is minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.