‘राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रम’
By Admin | Updated: August 5, 2014 00:13 IST2014-08-04T23:44:32+5:302014-08-05T00:13:12+5:30
जिल्हा परिषदेचा पुढाकार : अभिलेख अद्ययावत करण्याचा प्रयत्न

‘राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रम’
कोल्हापूर : ग्रामपंचायत स्तरावरील अभिलेखे अद्ययावत व सुस्थितीत ठेवण्यासाठी राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ९ आॅगस्ट ते २ आॅक्टोबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीस घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. अनेक महत्त्वाच्या योजना व विकासकामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केलेली आहेत. यासाठी ग्राम व्यवस्थेमध्ये सुप्रशासनाची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व प्रशासकीय बाबींसंदर्भातील घरठाणपत्रक, कर आकारणी नोंदवही, किरकोळ वसुली नोंदवही, खर्चाची प्रमाणके, बांधकामासंदर्भातील करारपत्रे, मोजमाप पुस्तके, स्थावर व जंगम मालमत्ता नोंदवही, जन्म, मृत्यू व विवाह नोंदवही, रोजकीर्द आदी महत्त्वाचे अभिलेखे आहेत. त्याचा वापर भविष्यात वारंवार करावा लागतो. अभिलेखांचे वर्गीकरण व स्कॅनिंग केल्यानंतर भविष्यात मागील कागदपत्रे तत्काळ व सुरक्षित उपलब्ध होऊन प्रशासकीय कामकाज करणे अत्यंत सोयीचे होणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुधारणा व सुसूत्रता आणण्यासाठी ९ आॅगस्ट, क्रांतीदिनापासून ‘राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रम’ हाती घेतला आहे. ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असून चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे मूल्यांकनही केले जाणार आहे.
हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी अध्यक्ष असणार आहेत.