राजारामच्या सत्ताधाऱ्यांना सभासदच घरी बसवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:18+5:302021-09-18T04:26:18+5:30
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी : पराभव दिसल्याने प्रलोभने लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : छत्रपती राजाराम साखर ...

राजारामच्या सत्ताधाऱ्यांना सभासदच घरी बसवतील
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी : पराभव दिसल्याने प्रलोभने
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने विद्यमान संचालकांना आता ऊस उत्पादक सभासदांची आठवण येऊ लागली आहे. परंतु स्वाभिमानी ऊस उत्पादक सभासद या सत्ताधारी मंडळींना घरात बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला. संचालक मंडळाने सभासदांना क्रेडिटवर बियाणे, सवलतीच्या दरातील साखर तसेच कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप केले आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीत कारखान्याचे स्वाभिमानी सभासद अशा आमिषाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास परिवर्तन आघाडीने व्यक्त केला. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने या वर्षीच्या महापुराने नुकसान झालेल्या सभासदांना क्रेडिटवर ऊस बियाणे, रोपे देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र २००५ व २०१९ ला सुद्धा अशाच प्रकारे पिकाचे नुकसान झाले होते. त्यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळाला बियाणे देण्याची बुद्धी का सुचली नाही, असा सवालही त्यांनी केला. पत्रकावर रवींद्र रेडेकर, शिवाजी फराकटे, दत्तात्रय उलपे, रवींद्र उलपे, जे. एल. पाटील, विद्यानंद जामदार, मोहन सालपे, आबासाहेब पोवार, संदीप नेजदार यांच्या सह्या आहेत.
चौकट : भगवानरावांची आठवण २८ वर्षानंतर कशी झाली?
ज्या स्व. भगवानराव पवार यांना अपमानित करून कारखान्यातून बाहेर काढले त्या भगवानराव पवारांच्या नावाने सत्ताधाऱ्यांनी ऊस विकास योजना चालू केली आहे. भगवानरावांची आठवण आता २८ वर्षांनंतर कशी झाली, असा सवालही परिवर्तन आघाडीने उपस्थित केला. राजारामने गेल्या २५ वर्षे सभासदांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याची माहिती जाहीर सभेत द्यावी, असे आव्हानही परिवर्तन आघाडीने दिले. गेली दीड वर्षे सभासदांच्या कोरोनाचे संकटात असताना सत्ताधाऱ्यांना आताच कोरोना प्रतिबंधक साहित्य द्यावयाचे का वाटले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.